तुम्ही एकटे नाही, ध्येय निश्चित करा, यश तुमचेच आहे
By Admin | Updated: May 18, 2015 02:00 IST2015-05-18T02:00:39+5:302015-05-18T02:00:39+5:30
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुला, मुलींकरिता सेवाग्राम यात्रीनिवासात शिबिर आयोजित करण्यात आले होते.

तुम्ही एकटे नाही, ध्येय निश्चित करा, यश तुमचेच आहे
सेवाग्राम : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुला, मुलींकरिता सेवाग्राम यात्रीनिवासात शिबिर आयोजित करण्यात आले होते. रविवारी शिबिराचा समारोप झाला. सात दिवस चाललेल्या या शिबिरातून अनेक सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी मार्गदर्शन केले. यात त्यांनी या चिमुकल्यांना ‘तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्या सोबत आहो. ध्येय निश्चित करा, यश तुमचेच आहे’ असे मार्गदर्शन करीत त्यांची हिंमत बांधण्याचा प्रयत्न केला.
यात्री निवासात एम.एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुली, मुलांसाठी मार्गदर्शन शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा महिला बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष संगीता धनाढ्य होत्या. अतिथी म्हणून सुषमा पाखरे, अजय भोयर, राजेंद्र मिरापूरकर, प्रकल्प समन्वयक किशोर जगताप, रोटरी क्लबचे राकेश माहेश्वरी व भरत सोमानी उपस्थित होते. यावेळी वर्ग पहिले ते बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
प्रास्ताविकातून किशोर जगताप यांनी डॉ.एम.एस. स्वामिनाथन यांनी विदर्भातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकऱ्यांच्या पाल्यासाठी आयोजित या शिबिरात ५८ गावे आणि ६५ परिवारातील वर्ग पहिली ते बारावीपर्यंत १२६ विद्यार्थ्यांना या वेळी मदत देण्यात येत असल्याचे सांगितले. सेवाग्राम येथे आयोजित या शिबिरात वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील एकूण १९ मुले- मुली सहभागी झाले होते.
यावेळी सुषमा पाखरे, राजेंद्र मिरापूरकर, भरत सोमानी व अजय वानखेडे यांनी मनोगत व्यक्त केले. शिबिराचे उद्घाटन ११ मे रोजी निवासी जिल्हाधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी प्रा. धनंजय सोनटक्के व जिल्हा बालकल्याण समितीचे अजय भोयर उपस्थित होते.
शिबिरात योग, इंग्रजी, गणित, विज्ञान, आर्ट अॅन्ड क्राप्ट, शेतीवर्सन प्रश्नमंजुषा, कथाकथन, खेळ यासाठी बजाज विज्ञान केंद्रात शिबिरार्थीनी ज्ञान प्राप्त केले. अहवाल वाचन संयोजिका सोनाली फाटे यांनी केले. तर संचालन अश्विनी वानखेडे यांनी केले. आभार सोजल ठोंबरे हिने मानले. आयोजनाकरिता अनेकांनी सहकार्य केले. (वार्ताहर)