योगाभ्यासाने झाली वर्धेकरांची पहाट
By Admin | Updated: June 22, 2015 01:44 IST2015-06-22T01:44:06+5:302015-06-22T01:44:06+5:30
पहाटेपासूनच शहरातील रस्त्यांवर नागरिकांची गर्दी पाहावयास मिळत होती. निमित्त होते आंतरराष्ट्रीय योग दिनाचे.

योगाभ्यासाने झाली वर्धेकरांची पहाट
विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक व विविध योग संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग
वर्धा: पहाटेपासूनच शहरातील रस्त्यांवर नागरिकांची गर्दी पाहावयास मिळत होती. निमित्त होते आंतरराष्ट्रीय योग दिनाचे. या दिनानिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे रविवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक योग दिनाची सुरुवात जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांनी वृक्षारोपण करून केली. त्यांनी योगसाधनाही केली. योगसाधना करण्यासाठी चिमुकल्यांपासून ज्येष्ठ या योेग दिनामध्ये सहभागी झाले होते.
जिल्हा क्रीडा संकुलातील सभागृहात जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा कार्यालय आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जिल्ह्यातील पंतजली योग समिती, आर्ट आॅफ लिव्हींग, प्रजापिता ब्रह्मकुमारीज आदीसह विविध सामाजिक व योग संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रमाला आमदार पंकज भोयर, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष रेवतकर, जि.प. प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे, गुरूदेव सेवा मंडळाचे प्रसारक हांडे, प्रकाश कदम, डॉ. शिरीष गोडे, मिलिंद देशपांडे, रवी भुसारी यांची उपस्थिती होती.
पंतजली योग समितीचे जिल्हाध्यक्ष दामोधर राऊत यांनी योगसाधनेबाबत माहिती देवून प्रत्येकाकडून योगासने करून घेतली. प्रात्यक्षिक अरविंद वंजारी, मोहन काळे यांनी करून दाखविले. तसेच योग आसनांमध्ये येत असलेल्या अडचणींवर पंतजलीच्या साधकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पंतजली समितीचे राऊत यांनी कार्र्यक्रमाची सुरुवात इतनी शक्ती हमे दे ना दाता... मन का विश्वास कमजोर होना, या गीताने केली. त्यानंतर सामूहिक प्रार्थना झाली.
ध्यानधारणा करताना आर्ट आॅफ लिव्हींगचे विवेक पाटील, तर स्योगनिद्रेसाठी अरविंद बालपांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ब्रह्मकुमारीच्या माधुरी यांनी उर्जा आणि आत्म्याबाबत ध्यानधारणा करण्यासाठी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष रेतवकर यांनी मानले. (प्रतिनिधी)
वृक्षारोपणाने झाली योगदिनाची सुरुवात
जागतिक योग दिनाची सुरुवात जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांनी वृक्षारोपण करून केली.
पंतजलीच्या साधकांच्या मार्गदर्शनात उपस्थितांनी योगाभ्यास केला. यावेळी आलेल्या अडचणींचे निरसरणही करण्यात आले. सकाळपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमाला वर्धेतील नागरिकांची उपस्थिती होती.