‘हां बाबू ये सर्कस है, शो तीन घंटे का़़़’
By Admin | Updated: March 30, 2015 01:46 IST2015-03-30T01:46:51+5:302015-03-30T01:46:51+5:30
हत्ती, घोडे, सिंह, वाघ, अस्वल यांची पिंजऱ्यासह सवारी, गाड्यांवर कलावंत, ‘चल मेरे हाथी’च्या सुरात वाद्यवृंद, जाहिरातीचे फलक अशी मिरवणूक निघाली की सर्कस आल्याचे कळत होते;

‘हां बाबू ये सर्कस है, शो तीन घंटे का़़़’
प्रभाकर शहाकार पुलगाव
हत्ती, घोडे, सिंह, वाघ, अस्वल यांची पिंजऱ्यासह सवारी, गाड्यांवर कलावंत, ‘चल मेरे हाथी’च्या सुरात वाद्यवृंद, जाहिरातीचे फलक अशी मिरवणूक निघाली की सर्कस आल्याचे कळत होते; पण आज वॉट्स अॅप, टष्ट्वीटर, फेसबुकच्या युगात अशा मिरवणुका बंद झाल्या असून केवळ हायटेक प्रचार सुरू झाला आहे.
सर्कसमधील प्राण्यांच्या खेळांवर बंदी आली़ यामुळे सर्कस प्रेमी निराश झाले़ प्राण्यांच्या गैरहजेरीने सर्कसचा आत्माच हरविला; पण श्रोत्यांना आपल्या विदुषकी करामतींनी हसविणारे विदुषक, एकाहून एक सरस कवायती, कसरतीचे खेळ दाखविणारे कलावंत आजच्या काळातही सर्कसचे अस्तित्व कायम राखत आहेत़
४५ वर्षाचं वय आणि उंची अडीच फुट; पण तंबूत उपस्थितांना आपल्या नावीन्यपूर्ण विनोदाने हसायला लावणारा गुड्ड्या ऊर्फ रमेश बर्मन हा पश्चिम बंगाल येथील कुचबिहार जिल्ह्याचा विनोदवीर येथील न्यू कमल सर्कसचे आकर्षण ठरला आहे. १५ बाल व १० युवा कलावंताचा ताफा घेऊन २० वर्षांनी प्रथमच ही सर्कस शहरात डेरेदाखल झाली.
जेमिनी-जम्बो, ग्रेट बॉम्बे, राजकमल, एरिना या देशविख्यात सर्कसमध्ये ३० वर्षांपासून विदुषकाचे काम करणाऱ्या रमेश बर्मनने आपल्या कामाची सुरुवात वयाच्या दहाव्या वर्षी बंगालमध्येच प्लाझा सर्कसपासून केली. स्वातंत्र्यानंतर कार्लेकर, कमल, एरिना-ग्रेट ओरिएन्टल आशिया, जम्बो सारख्या किमान १५० हून अधिक सर्कस शौकिनांच्या सेवेत होत्या; पण हत्ती, घोडे, सिंह, वाघ या प्राण्यांच्या सर्कसमधील खेळांवर बंदी आल्याने आता देशात किमान ५०-६० सर्कस अस्तित्व टिकवून आहे. सर्कसमधील तीन तासांच्या खेळापैकी एक-दीड तास प्राण्यांचे खेळ असायचे़ यामुळे बालकांसह आबालवृद्धांचे मनोरंजन होत असे; पण आता श्रोते यापासून वंचित झाल्याची खंत गुड्ड्याने व्यक्त केली. सहा हजार या कमी मानधनावर सर्कसचे अस्तित्व टिकवण्यासाठी आम्ही विनोद करून रसिकांना हसवितो; पण भविष्यात प्राण्यांच्या खेळावरील बंदी न हटल्यास सर्कसचे अस्तित्व धोक्यात येऊन कलावंतांच्या जीवनात उदासिनता येऊ शकते, अशी वेदनाही रमेश बर्मनने व्यक्त केली. सर्कसचे शो आता तीनऐवजी दोन तासावर आल्याचे व्यवस्थापक मुकीन खान, उदय नायर यांनी सांगितले.