यंदाची दिवाळी पुरणपोळीविनाच
By Admin | Updated: October 28, 2016 01:34 IST2016-10-28T01:34:07+5:302016-10-28T01:34:07+5:30
दिवाळीच्या सणात गोड म्हणताच हातावर आणून पानावर खाणाऱ्यांना पुरणाशिवाय पर्याय नसतो.

यंदाची दिवाळी पुरणपोळीविनाच
पुरवठाच नाही : स्वस्त धान्य दुकानातून चणाडाळ बेपत्ता
रूपेश खैरी वर्धा
दिवाळीच्या सणात गोड म्हणताच हातावर आणून पानावर खाणाऱ्यांना पुरणाशिवाय पर्याय नसतो. त्यांची दिवाळी गोड करणारा पदार्थ म्हणून पुरणाची विशेष ओळख आहे; मात्र जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानात गत दोन महिन्यांपासून चण्याची डाळ बेपत्ता असल्याने यंदाच्या दिवाळीत त्यांच्या घरी पुरण शिजणार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
दिवाळसण तोंडावर येताच महागाईचा भडका उडणे नवे नाही. यात गत महिन्यांपासूनच चण्याच्या डाळीच्या दराने चांगलीच भरारी घेतली आहे. आज चण्याची डाळ बाजारात सरासरी १४० रुपये किलोंवर आहे. हातावर आणून पानावर खाणाऱ्यांकरिता ती विकत आणणे सध्यातरी अवघड झाले आहे. मध्यंतरी शासनाच्यावतीने सर्वांनाच चण्याची डाळ ७५ रुपये किलोच्या दराने देण्याची घोषणा केली होती; मात्र जिल्ह्यात गत दोन महिन्यांपासून चण्याच्या डाळीचे आवंटनच आले नसल्याने स्वस्त धान्य दुकानातून डाळ बेपत्ता झाली आहे.
दिवाळीच्या सणात चण्याच्या डाळीपासून तयार करण्यात आलेल्या चकली, शेव आदी पदार्थांची विशेष मागणी असते. या काळात गरीबांना स्वस्त धान्याच्या दुकानातून चण्याची डाळ मिळण्याची अपेक्षा होती. मात्र जिल्ह्यातील दुकानातून ही डाळ बेपत्ता असल्याने यंदाच्या दिवाळीत नेहमीच्या तुलनेत अधिक महाग असल्याने डाळ कशी व कुठून आणावी या चिंतेने अनेकांच्या चेहऱ्याचा रंग उडविला आहे. या काळात निदान शासनाने केलेली घोषणा पूर्ण करावी अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे.
तुरीची डाळही बेपत्ता
साठेबाजांमुळे काही दिवसांपूर्वी तुरीच्या डाळीने झळाळी घेतली होती. मात्र शासनाच्यावतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेत तुरीची डाळ मिळणे सोपे झाले. शासनाने कारवाई करीत मोठ्या प्रमाणात तुरीचा साठा ताब्यात ठेवला आहे. असे असले तरी स्वस्त धान्य दुकानात अद्याप तुरीची डाळ आली नाही. परिणामी नागरिकांना चण्याच्या डाळीसह तुरीच्या डाळीकरिताही भटकंती करावी लागत असल्याचे वास्तव जिल्ह्यात आहे.
चण्याचे दरही कडाडलेलेच
शेतकऱ्यांच्या घरातील चणा संपल्यानंतर आज बाजारात चण्याला कधी नव्हे तेवढा १० हजार रुपयांचा दर मिळाला आहे. यामुळे बाजारात असलेले डाळीचे दर कोसळण्याची शक्यता नाही. परिणामी नागरिकांना आणखी काही दिवस चण्याच्या डाळीचे चढलेले दर कायम राहणार असल्याचे संकेत आहेत.
जिल्ह्यात ५५ हजार शिधापत्रिकाधारक
जिल्ह्यात अन्न पुरवठा विभागाकडे एकूण ५५ हजार शिधापत्रिकाधारक आहेत. या शिधापत्रिकाधारकांकडून स्वस्त धान्य दुकानातून धान्याची उचल केली जाते. त्यांना या दुकानातून साखर, गहू व तांदूळ मिळत आहे. मात्र या काळात साऱ्यांना हवी असलेली चण्याची डाळ दुकानातून बेपत्ता असल्याचे दिसताच त्यांचा हिरमोड होत आहे. स्वस्त धान्य दुकानातून एका शिधापत्रिकेवर एक किलो डाळ देण्याचा निर्णय असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र याच एक किलो डाळीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.