यंदा १.८२ लाख हेक्टरात कापूस
By Admin | Updated: May 19, 2014 23:51 IST2014-05-19T23:51:18+5:302014-05-19T23:51:18+5:30
खरीप हंगामासाठी शेतकर्यांच्या मागणीनुसार बियाणे, खते, औषधी तसेच वेळेवर पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी खाजगी बियाणे उत्पादन करणार्या संस्था,

यंदा १.८२ लाख हेक्टरात कापूस
पालकमंत्र्यांकडून खरीपाचा आढावा : शेतकर्यांना सहकार्य करण्याचे आवाहन
वर्धा : खरीप हंगामासाठी शेतकर्यांच्या मागणीनुसार बियाणे, खते, औषधी तसेच वेळेवर पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी खाजगी बियाणे उत्पादन करणार्या संस्था, खत पुरवठादार तसेच राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रतिनिधी शेतकर्यांना खरीप हंगामासाठी संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी केले. वर्धा जिल्ह्यात आगामी खरीप हंगामासाठी ४ लक्ष २० हजार हेक्टर क्षेत्रात पेरणीचे नियेजन करण्यात आले असून, यामध्ये सर्वाधिक १ लक्ष ८२ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात कापूस, १ लक्ष ६९ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीन तर ६२ हजार ७०० हेक्टर क्षेत्रात तूर आदी पिकांच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. अतिवृष्टी व गारपीटीमुळे सोयाबीन पिकांची मोठ्या प्रमाणात उत्पादकता कमी झाल्यामुळे बियाणांच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकर्यांनी कापूस आदी पिकांना प्राधान्य द्यावे असेही पालकमंत्री मुळक यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात खरीप हंगामात विविध पिकांचे नियोजन तसेच बियाणांची व खतांची उपलब्धता शेतकर्यांना खरीप कर्जाचे वाटप आदींचे नियोजन पालकमंत्री मुळक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आलीे.खरीप हंगामामध्ये शेतकर्यांना उत्तम प्रतीचे बियाणे, रासायनिक खते आदी शेतकर्यांच्या मागणीप्रमाणे पुरवठा करण्यासाठी जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर नियोजन करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी केल्यात. जिल्ह्यात उत्पादन वाढीसाठी विशेष कार्यक्रम तयार करून शेतकर्यांना त्यांच्या शेतापर्यंत या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी विशेष मोहिम राबवावी. सोयाबीन या पिकाकडे शेतकर्यांच्या विशेष कल वाढत असल्यामुळे त्याच्या मागणीनुसार बियाणे उपलब्ध करून देतानाच शेतकर्यांकडे असलेल्या बियाणांवर प्रक्रिया करून पेरणी करण्यासंदर्भात विशेष जनजागृती मोहिम राबविण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. प्रारंभी जिल्हाधिकारी एन.नवीन सोना यांनी स्वागत करून खरीप हंगामात विविध पिकांच्या नियोजनाबाबत माहिती दिली. बीबीएफ पद्धतीद्वारे पेरणी संदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयातर्फे शेतकर्यांच्या मार्गदर्शनासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष मार्गदर्शन भिंतीपत्रकाचे तसेच शेतकर्यांसाठी असलेल्यसा सुविधे संदर्भातील टोल फ्री क्रमांकाच्या पोस्टरचे विमोचन यावेळी पालकमंत्री मुळक व राज्यमंत्री रणजित कांबळे यांच्याहस्ते यावेळी करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम तसेच पर्यटन राज्यमंत्री रणजित कांबळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे, आमदार अशोक शिंदे, दादाराव केचे, मुख्य कार्यपालन अधिकारी उदय चौधरी, अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत, विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे, तसेच राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी, खतपुरवठा कंपन्यांचे प्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)