यंदा गव्हाच्या तुलनेत हरभऱ्याचे लागवड क्षेत्र वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 05:00 IST2020-12-21T05:00:00+5:302020-12-21T05:00:27+5:30
खरीपात तोंडचा घास पडल्यानंतर सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांची रबी पिकांवर भिस्त असते. यंदा खरीपाच्या सुरूवातीला पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. तर नंतर झालेल्या पावसामुळे पिकाची बऱ्यापैकी वाढ झाली. यंदा समाधानकारक उत्पन्न होईल अशी आशा असतानाच जिल्ह्यात सततच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना आर्थिक फटका सहन करावा लागला.

यंदा गव्हाच्या तुलनेत हरभऱ्याचे लागवड क्षेत्र वाढले
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यंदा खरीपात सोयाबीन उत्पादकांचे सततच्या पावसाने तर कपाशी उत्पादकांचे गुलाबी बोंडअळीने कंबर्डे मोडल्याने सिंचनाची सोय असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची रबी पिकांवर भिस्त आहे. याच पार्श्वभूमीवर सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी यंदा एकूण ७० हजार २१०.८० हेक्टरवर रबी पिकांची लागवड केली आहे. यंदा गव्हाच्या तुलनेत हरभऱ्याचे लागवड क्षेत्र वाढल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.
खरीपात तोंडचा घास पडल्यानंतर सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांची रबी पिकांवर भिस्त असते. यंदा खरीपाच्या सुरूवातीला पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. तर नंतर झालेल्या पावसामुळे पिकाची बऱ्यापैकी वाढ झाली. यंदा समाधानकारक उत्पन्न होईल अशी आशा असतानाच जिल्ह्यात सततच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना आर्थिक फटका सहन करावा लागला. तर याच सततच्या पावसादरम्यान गुलाबी बोंडअळीने डोकेवर काढून नुकसानीची पातळी गाठल्याने कापसाच्या उत्पादनात घट आली. असे असले तरी या आर्थिक नुकसानीला न जुमानता सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी यंदा रबी पिकांची लागवड केली आहे. जिल्ह्यात रबीचे सरासरी क्षेत्र ४७ हजार ६१९.६५ हेक्टर असताना तब्बल ७०,२१०.८० हेक्टरवर विविध पिकांची लागवड झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.
वेळीच मार्गदर्शन केल्यास शंकांचे होणार समाधान
सध्या गहू, चणा व इतर रबी पिकांची स्थिती समाधानकारक आहे. पण ढगाळी वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण कायम आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून वेळोवेळी मार्गदर्शन केल्यास शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधान होईल.