संपूर्ण दारूबंदीसाठी यवतमाळच्या महिलांची वर्धेतून आगेकूच

By Admin | Updated: December 8, 2015 03:01 IST2015-12-08T03:01:40+5:302015-12-08T03:01:40+5:30

गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली आणि अनेकांचे संसार बचावले. हाच निर्धार करीत यवतमाळ येथील कष्टकरी,

Yavatmal women's welfare ahead for whole potion | संपूर्ण दारूबंदीसाठी यवतमाळच्या महिलांची वर्धेतून आगेकूच

संपूर्ण दारूबंदीसाठी यवतमाळच्या महिलांची वर्धेतून आगेकूच

वर्धा : गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली आणि अनेकांचे संसार बचावले. हाच निर्धार करीत यवतमाळ येथील कष्टकरी, मजूर व पीडित आपल्या जिल्ह्यात दारूबंदी व्हावी म्हणून संघर्ष करीत आहे. आंदोलने, निवेदनांकडे शासन लक्ष देत नसल्याने सरकार कुणाचे, असा सवाल करीत यवतमाळ ते नागपूर अशी पदयात्रा काढण्यात आली. जीर्ण व उद्ध्वस्त संसाराचे प्रतिक म्हणून आपल्या फाटक्या साड्या सह्या करून मंत्र्यांना देण्यात येणार आहेत.
शेतकरी आत्महत्या, कुमारिकेचे प्रश्न, बेरोजगारी, आदिवासींच्या समस्या, सिंचनाचा अभाव, शेतीची दयनीय अवस्था, उद्योगांची कमतरता आणि आता दारूचा महापूर यामुळे अनेक कुटुंबे देशोधडीला लागली. हिंसा व अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. मारहाण, शिवीगाळ नित्याचेच झाले आहे. या अनुषंगाने गाव व जिल्हा पातळीवर अनेकविध आंदोलने केली; पण त्याची दखलही घेण्यात आली नाही. या पार्श्वभूमीवर आणि शेवटचा निर्धार म्हणून महेश पवार, योगेश राठोड या तरुणांच्या तसेच बेबी नंदा पाटील, चंदा देवगडे, नीता मांडवथरे यांच्या नेतृत्वात यवतमाळ ते नागपूर, अशी १५० किमीची पदयात्रा शुक्रवारपासून सुरू करण्यात आली. ३०० महिला व पुरूष या पदयात्रेत सहभागी झाले.
कोरेगाव-यावलीचे दारूबंदीचे अध्यक्ष तथा पोलीस पाटील सभेतून परत येत असताना त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली. काही महिलांनाही दोरीने बांधून मारहाण करण्यात आली; पण कुठलीही कारवाई झाली नाही. त्यांना न्याय मिळावा म्हणून तसेच जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी व्हावी यासाठी पदयात्रेतून संदेश दिला जात आहे. यात्रेला कळंब येथून शुक्रवारी प्रारंभ झाला. शनिवारी ही यात्रा भिडी येथून निघून नालवाडी येथील मंगल कार्यालयात पोहोचली. रविवारी ही यात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन व बुद्धवंदना करून डोक्यावर संविधानाची प्रत व हातात दारूबंदीचे फलक घेत नागपूरला रवाना झाली. वर्धेत आशीष गोस्वामी, पियूष राऊत, आदित्य चावरे, प्राजक्ता, किशोर, सीमा पुसदकर, टोणपे, बाळा माऊसकर आदींनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Yavatmal women's welfare ahead for whole potion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.