यशोदा नदीचे होणार पुनरूज्जीवन
By Admin | Updated: February 22, 2017 00:46 IST2017-02-22T00:46:41+5:302017-02-22T00:46:41+5:30
सिंचन क्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार हे महत्त्वाकांक्षी अभियान सुरू केले.

यशोदा नदीचे होणार पुनरूज्जीवन
जलयुक्त शिवार अभियान : २०१६-१७ मध्ये २१४ गावांची निवड
प्रशांत हेलोंडे वर्धा
सिंचन क्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार हे महत्त्वाकांक्षी अभियान सुरू केले. आता २०१६-१७ साठी या अभियानात ‘यशोदा नदी पुनर्जीवन प्रकल्प’ राबविला जात आहे. यंदा २१४ गावांची निवड करण्यात आली असून ३३ गावांतील विविध कामांना प्रारंभ करण्यात आला आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठीही आताच गावांची निवड करण्यात येणार आहे. सिंचनासह पिण्यायोग्य पाण्याच्या साठ्यात वाढ करणे, हे उद्दिष्ट यशोदा नदी पुनर्जीवन प्रकल्पाचे आहे.
राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानामध्ये २०१५-१६ मध्ये कृषी विभागाकडून २१३ गावांतील कामे हाती घेण्यात आली होती. यातील २ हजार ९९३ कामे पूर्ण करण्यात आली असून सुमारे ४०० कामे प्रलंबित राहिली होती. यातील निधी प्राप्त झाल्यामुळे २०० कामे सुरू झाली आहेत. यात ढाळीचे बांध बाधणे, नाला खोलीकरण आदी कामांचा समावे आहे. शिवाय याच अभियानांतर्गत ‘एरीया ट्रीटमेंट’ची कामेही करण्यात आली. सुमारे ५८ हजार १०७ हेक्टरवर ही कामे करण्यात आलीत. यात पाणी रोखून जमिनीत मुरविले जाते. या पद्धतीमुळे माती वाहून जात नाही. परिणामी, जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. गतवर्षी नाला खोलीकरणाची ५२७ कामे झाली. यात ११० किमीपर्यंत सुमारे ९६६० सहस्त्र घनमीटर पाणी साठविण्यात आले आहे. धरणे, प्रकल्प जेथे पोहोचू शकत नाही, अशा गावांची निवड करून हे अभियान राबविले जात आहे. जलयुक्त शिवार अभियानसाठी निवडलेल्या गावात सर्व कामे पूर्ण झाली पाहिजे, या उद्देशाने कृषी विभागाकडून कामे केली जात आहेत. जुन्या सिमेंटच्या नाला बांधाच्या ठिकाणी खोलीकरणाच्या कामांना यात प्राधान्य दिले जात आहे. २५३ जुन्या नाला बंधाऱ्यांची दुरूस्ती करण्यात आली आहे. यासाठी महात्मा फुले जलभूमी अभियानाचा निधी वापरण्यात आला आहे. गतवर्षी झालेल्या या कामांमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून सिंचन क्षेत्रात वाढ झाली.
आता २०१६-१७ मध्ये २१४ गावांमध्ये विविध कामे सुरू करण्यात आलीत. यातील यशोदा नदीच्या काठावरील गावांत ३३ कामे सुरू करण्यात येणार आहे. खोलीकरणासह ढाळीचे बांध बांधले जाणार असून मृत जलस्त्रोत जिवंत करण्यात येणार आहे. खोलीकरणाची ३६३ कामे करण्यात येणार असून यासाठी बजाज फाऊंडेशनचे सहकार्य लाभणार आहे. उगम ते संगम पद्धतीने यशोदा नदी पुनर्जीवन प्रकल्प राबविला जात आहे. यामुळे नदी काठावरील तसेच काही किमी अंतरातील पाण्याची पातळी वाढणार आहे. परिणामी, सिंचन क्षमतेतही वाढ होणार आहे.
जलयुक्त शिवार अभियानमुळे शेतकऱ्यांना प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत नाही. खरीप तसेच रबी हंगामातील पिकांनाही याद्वारे जलसाठा उपलब्ध झाला आहे. यामुळेच यंदा रबी हंगामातील पीक क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून आले. यावर्षीची कामे पूर्ण झाल्यानंतर सिंचन क्षमतेत मोठी वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शिवाय यशोदा नदी पुनर्जीवन प्रकल्पामुळे काही प्रमाणात पाणीटंचाईची समस्याही मार्गी लागणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.