चुकीची वायरिंग, उपकरणे जळाली
By Admin | Updated: October 28, 2016 01:42 IST2016-10-28T01:42:55+5:302016-10-28T01:42:55+5:30
स्व्थानिक वॉर्ड क्र. १४ व १५ मध्ये विद्युत पुरवठा करण्याकरिता नवीन रोहित्र बसविण्यात आले

चुकीची वायरिंग, उपकरणे जळाली
दहा लाखांच्या नुकसानीचा अंदाज : नवीन रोहित्र ठरले तापदायक
समुद्रपूर : स्व्थानिक वॉर्ड क्र. १४ व १५ मध्ये विद्युत पुरवठा करण्याकरिता नवीन रोहित्र बसविण्यात आले; पण यात चुकीचे विद्युत प्रवाह करणारे वायर जोडण्यात आले. परिणामी, सदर वॉर्डातील टीव्ही, फॅन, फ्रीज, बल्ब जळाल्याने नागरिकांचे सुमारे १० लाख रुपयांवर नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
वॉर्ड क्र. १४ व १५ मधील विद्युत पुरवठा करणारे ट्रान्सफार्मर बसविण्याकरिता वर्धा येथील रूद्रानी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. बुधवचारी ट्रान्सफार्मर बसवून ४ वाजताच्या सुमारास विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला. दरम्यान, अचानक नागरिकांचे टीव्ही, फॅन, फ्रीज, सी.एफ.एल. बल्ब, जलशुद्धीकरण यंत्र जळाल्याच्या तक्रारी यायला लागल्या. नागरिक ओरडत रस्त्यावर आले. कित्येकांना मोबाईल चार्जरमध्ये सुद्धा करंट आल्याचे जाणवले. माहिती प्राप्त होताच विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. नंतर पाहणी केली असता ट्रान्सफार्मरमध्ये चुकीचा विद्युत पुरवठा करण्यात आल्याचे लक्षात आले; पण तोपर्यंत १०० नागरिकांकडील उपकरणे जळाली होती. यात सुमारे १० लाख रुपयांवर नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
घटनास्थळी उपकार्यकारी अभियंता वसंत हेडाऊ, सहा. अभियंता अमित वानखेडे दाखल झाले. त्यांनी ट्रान्सफार्मरची पाहणी करीत वायर सरळ करून विद्युत पुरवठा सुरळीत सुरू केला. यात नितीन बांगडे, ज्ञानदेव उराडे, दिनेश नरताम यांच्या घरातील अधिक साहित्य जळाल्याने मोठे नुकसान झाले. अनिल जुमडे, राष्ट्रपाल कांबळे, माणिक चिखलकर, दशरथ चावरे, राजू मेंढे, जयंत मोटघरे, संजय वालझडे, रामभाऊ आकडे, भाऊ शेंडे, वासुदेव धंदाडे, नत्थू शेळके, सुनील बेतवार, रामचंद्र वीने, गजानन बाळसराफ, ढोणे, विशाल हांडे, काशीनाथ थुटे, राजू कौराते सह १०० च्यावर घरातील उपकरणे जळाली. याबाबत वरिष्ठांना तक्रार केली आहे.(तालुका प्रतिनिधी)