कृषी कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन
By Admin | Updated: October 5, 2016 01:41 IST2016-10-05T01:41:37+5:302016-10-05T01:41:37+5:30
जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या कृषी अधिकाऱ्यांचा राज्य संवर्गात समावेश करण्यात यावा,

कृषी कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन
सीईओंना निवेदन : जिल्हा परिषदेसमोर धरणे
वर्धा: जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या कृषी अधिकाऱ्यांचा राज्य संवर्गात समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कृषी तांत्रिक कर्मचारी संघटनेच्यावतीने बेमुदत लेखणी बंद आंदोलन करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासन दरबारी पोहोचवून त्यांच्या पाठपुराव्याकरिता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांना निवेदन देण्यात आले. तसेच जि.प. इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ धरणे देवून आंदोलनाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
जिल्हा परिषदेकडील कृषी अधिकारी हे पद राज्य शासन कृषी विभागाच्या आकृतीबंधातील आहे. सदर पद कृषी विभागातील मंडळ कृषी अधिकारी गट-ब (कनिष्ठ) या पदाला समकक्ष आहे. या दोन्ही पदाची पदोन्नती तालुका कृषी अधिकारी या पदावर होते. वेतनश्रेणी सुद्धा सारखी आहे. शिवाय विभागीय आयुक्त, कृषी आयुक्त तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कृषी अधिकारी या पदास वर्ग-२ असा दर्जा देण्याबाबत शासनाला अनुकूल अभिप्राय दिलेला आहे; परंतु अद्यापही जिल्हा परिषदेकडील कृषी अधिकाऱ्यांना राजपत्रित दर्जा देण्यात आला नाही. या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी व कृषी विस्तार अधिकारी यांनी सोमवारपासून बेमुदत लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरावरही हे आंदोलन करण्यात येत आहे.
या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय बमनोटे, सचिव मनोज नगापूरकर, उपाध्यक्ष सुनील मुरारकर, राजीव शेंडे, संजय राऊत, प्रशांत भोयर, दिवाकर मौजे तसेच तालुक्यातील इतरांनी यामध्ये सहभाग देवून आंदोलनाची व्याप्ती वाढविली आहे.(प्रतिनिधी)