वेतनासाठी कामगारांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2015 01:31 IST2015-11-11T01:31:24+5:302015-11-11T01:31:24+5:30
दिवाळी हा महत्त्वाचा सण बुधवारी साजरा होत आहे. असे असताना कामगारांना आॅगस्ट महिन्यापासून वेतन मिळाले नाही.

वेतनासाठी कामगारांचा ठिय्या
पूर्ती शुगर अॅण्ड पॉवरचा प्रकार : चार महिन्यांचे वेतन थकीत, बोनसही नाही
आकोली : दिवाळी हा महत्त्वाचा सण बुधवारी साजरा होत आहे. असे असताना कामगारांना आॅगस्ट महिन्यापासून वेतन मिळाले नाही. कंपनी कायद्यानुसार बोनसही दिला गेला नाही. शिवाय दरवर्षी वाटप होणारी प्रती कामगार दहा किलो साखरही देण्यात आली नाही. यामुळे मंगळवारी सकाळी कामगारांनी काम बंद करून कार्यालयाच्या गेटपुढे ठिय्या आंदोलन केले.
दिवाळी वर्षातील सर्वात मोठा समजला जाणारा महत्त्वाचा सण आहे; पण पूर्ती प्रशासनाच्या चुकीच्या आर्थिक नियोजनामुळे कामगार कुटुंबीयांच्या दिवाळी सणावरच विरजण पडले आहे. पूर्ती शुगर अॅण्ड पॉवरमधील रोजगारावर शेकडो कुटूंब विसंबून आहे. अवघ्या ५ ते ७ हजार रुपये तुटपुंज्या वेतनावर कामगार आपला कुटुंबाचा गाडा हाकत आहे. आॅगस्ट महिन्यापासून कामगारांचे वेतन थकले. किराणा दुकानदारासह इतरांची देणगी थकली आहे. अशात दिवाळी सणाकरिता दुकानदार उधारीवर किराणा द्यायला तयार नसल्याची व त्यामुळे घरी चटणी-भाकर खाण्याची वेळ आल्याचे कामगारांनी बोलून दाखविले.
किमान एक महिन्याचे वेतन द्यावे, कंपनी कायद्यानुसार बोनस द्यावा वा एक महिन्याचे वेतन सानुग्रह मदत म्हणून देण्याची मागणी आहे. या मागण्यांकरिता कामगारांनी कामबंद आंदोलन करीत कंपनीच्या गेटसमोर ठिय्या मांडला. मागण्या मंजूर होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कामगारांनी केला. बुधवारी कंपनीच्या गेटसमोर घरची चटणी-भाकर आणून दिवाळी साजरी करण्याचा मानस कामगारांनी व्यक्त केला.
१० किलो साखरेच्या वाटपालाही हरताळ
पूर्ती शुगर अॅण्ड पॉवर कंपनीच्या कामगारांना आॅगस्ट महिन्यापासून वेतन देण्यात आले नाही. दिवाळी असताना बोनस नाही आणि प्रती कामगार १० किलो साखरही देण्यात आली नाही. यामुळे कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे. थकित वेतनाकरिता मंगळवारी कामगारांनी काम बंद करून गेटसमोर ठिय्या आंदोलन केले. सायंकाळपर्यंत आंदोलन सुरू होते; पण कुठलाही तोडगा निघाला नाही.
आंदोलनाची माहिती मिळताच पूर्ती समूहाचे कार्यकारी संचालक सुधीर दिवे कारखान्यात दाखल झाले. स्थानिक अधिकारी आणि विभाग प्रमुखांशी चर्चा करण्यात आली; पण आंदोलक कामगारांशी चर्चा करण्यात आली नाही. कारखान्यात दाखल झालेले दिवे कामगारांशी चर्चा करतील, अशी अपेक्षा होती; पण कुठलीही बोलणी न करताच ते नागपूरकडे रवाना झाले. या प्रकारामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.