समताधिष्ठित बहुजनवादी विचारातच कामगारांचे हित
By Admin | Updated: August 30, 2014 02:03 IST2014-08-30T02:03:53+5:302014-08-30T02:03:53+5:30
साम्यवादी, गांधीवादी, संघवादी विचारसरणीवर चालणाऱ्या कामगार चळवळी निर्माण झाल्या. परंतु विषमतावादाचा पुरस्कार करणाऱ्या संघटनांच्या ..

समताधिष्ठित बहुजनवादी विचारातच कामगारांचे हित
वर्धा : साम्यवादी, गांधीवादी, संघवादी विचारसरणीवर चालणाऱ्या कामगार चळवळी निर्माण झाल्या. परंतु विषमतावादाचा पुरस्कार करणाऱ्या संघटनांच्या कामगार चळवळीमुळे बहुजन समाजाच्या विद्युत कामगार कर्मचाऱ्यांच्या हिताचे कोणतेही धोरण राबविले गेले नाही. या कर्मचाऱ्यांचे खरे हित फुले-शाहू-आंबेडकराच्या बहुजनवादी समताधिष्ठित विचारधारेनेच साध्य होऊ शकते, असे प्रतिपादन अ. भा. स्वतंत्र मजूर संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस जे. एस. पाटील यांनी केले.
हिंगणघाट येथील आय. एम. ए. सभागृहात महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रबोधन मेळावा घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
प्रबोधन मेळाव्यात अतिथी म्हणून म. रा.विद्युत वितरण कंपनी प्रविभाग वर्धाचे कार्यकारी अभियंता एस. आर. कांबळे प्रमुख, संघटनेचे राज्य सरचिटणीस नरेंद्र जारोंडे, नागपूर ग्रामीण परिमंडळचे अध्यक्ष आर.आर. नगदेवते, विद्युत वितरण कंपनी हिंगणघाट विभागाचे कार्यकारी अभियंता एम.एस. वैद्य, विभागीय पदाधिकारी डी.एम. खैरे, आर्वीचे अधीक्षक अभियंता गायकवाड, गोवर्धन नगराळे आदी उपस्थित होते.
संघटनेद्वारे आजपर्यंत शेकडो आंदोलने, निदर्शने, धरणे, मोर्चे काढून बहुजन समाजातील विद्युत कामगार, कर्मचारी, अभियंते आदींच्या विविध प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून दिला असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. त्यामुळे समताधिष्ठित बहुजनवादी विचारधारा कामगारांनी अंगिकारण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी हिंगणघाट विभागातील सेवानिवृत्त विद्युत कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आयोजकांच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष जे. एस. पाटील याचाही शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रबोधन मेळाव्याचे प्रास्ताविक संघटनेचे हिंगणघाट विभागीय अध्यक्ष एन.एम. नाईक यांनी केले. अजय जवादे यांनी संचालन केले. गुणसागर नाईक यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. प्रबोधन मेळाव्याचे आयोजन संघटनेच्या हिंगणघाट विभाग शाखेच्या वतीने करण्यात आले होते.
मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी आर.डी. वानखेडे, एन.एम. नाईक, दयानंद हाडके, व्ही.व्ही. चतारे, किशोर कापसे, के.बी. उमरे, एस.व्ही. पाटील, ए.डब्ल्यू. खोब्रागडे, एन.जी. गोडघाटे, एम.सी. शंभरकर, पी.व्ही. जगताप, आर.एल. वाघमारे, बी.डी. पाटील, पाटणकर, डोंगरे, एस. जॉन, गजभिये, नंदकिशोर गोडघाटे यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)