कामगारांचे काम बंद आंदोलन
By Admin | Updated: June 3, 2016 02:07 IST2016-06-03T02:07:03+5:302016-06-03T02:07:03+5:30
रणरणत्या उन्हात गत ५५ दिवसांपासून शांततामय मार्गाने सुगूना फुडस प्रा.लि. वणी (हिंगणघाट) येथील कामगारांचे उपोषण सुरू आहे.

कामगारांचे काम बंद आंदोलन
सुगूणा कंपनीतील प्रकार : उपोषणकर्त्यांना समर्थन, पोलिसांचा बंदोबस्त
हिंगणघाट : रणरणत्या उन्हात गत ५५ दिवसांपासून शांततामय मार्गाने सुगूना फुडस प्रा.लि. वणी (हिंगणघाट) येथील कामगारांचे उपोषण सुरू आहे. गुरूवारी सुमारे १५० कामगारांनी काम बंद आंदोलन करून कंपनीच्या गेटसमोर नारेबाजी केली. उपोषणकर्त्यांना समर्थन व्यक्त करीत व्यवस्थापनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला. आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा याप्रसंगी कामगारांनी दिला. गेटवर पोलीस बंदोबस्त होता.
गुरूवारी सकाळी ६ वाजतापासून सुगूना फुडस कंपनीच्या सुमारे १५०-२०० कामगार व कंत्राटी कामगारांनी कामावर न जाता उपोषणकर्त्यांना समर्थन देण्याच्या उद्देशाने काम बंद आंदोलन केले. यावर लवकर तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा कामगारांनी दिला. ५५ दिवसांपासून व्यवस्थापन कामगारांच्या मागण्यांवर तोडगा काढत नसल्याने आंदोलन प्रदीर्घ चालत आहे. अद्याप तोडगा निघाला नसल्याने सर्व कामगारांनी कंपनीच्या गेटवर जमून काम बंद आंदोलनाची घोषणा केली. २९ मे रोजी सुगूनाच्या कामगारांनी वर्धा येथे कामगार मंत्री प्रकाश मेहता यांना भेटून निवेदन देत चर्चा केली. तोडगा निघेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली; पण अद्याप तोडगा निघाला नाही. काम बंद आंदोलनासाठी पोलीस बंदोबस्त लावला होता.(तालुका/शहर प्रतिनिधी)