पावसाळ्यातील रस्त्याचे काम नागरिकांनी पाडले बंद
By Admin | Updated: June 21, 2015 02:26 IST2015-06-21T02:26:13+5:302015-06-21T02:26:13+5:30
तळेगाव -आष्टी -दुर्गवाडा या मार्गावरील साहूर ते दुर्गवाडा या दोन कि़मी. रोड पूर्ण उखडला होता.

पावसाळ्यातील रस्त्याचे काम नागरिकांनी पाडले बंद
तळेगाव (श्या.पंत.): तळेगाव -आष्टी -दुर्गवाडा या मार्गावरील साहूर ते दुर्गवाडा या दोन कि़मी. रोड पूर्ण उखडला होता. पावसापूर्वी या रस्त्याचे बि.यु.जी. चे ६०० मिटरचे काम झाले. पण उर्वरीत काम भर पावसात सुरू करण्यात आले. त्यामुळे पावसातील रस्त्याच्या कामाचा दर्जा काय, असा प्रश्न उपस्थित करीत स्थानिक ग्रामस्थांनी सदर काम बंद पाडले.
प्राप्त माहितीनुसार, संजय कंस्ट्रक्शन कंपनी परतवाडा यांना साहूर ते दुर्गवाडा या २ कि.मी. रस्त्याचे डांबरीकरणाचे काम देण्यात आले. शासन धोरणानुसार १५ मे ते १५ सप्टेंबर या कालावधीत पावसाळा असल्याने डांबरीकरणाचे काम करता येत नाही. पाण्याचा थोडा जरी लवलेश असला तरी डांबर रस्त्यावर न चिपकता लगेचच उखडत जाते. नेमकी हीच परिस्थिती साहूर-दुर्गवाडा रस्त्यावर आहे. साहूर धाडी, दुर्गवाडा परिसरात १५ दिवसांपासून सारखा पाऊस सुरू असून साहूर-दुर्गवाडा रस्त्यावर पाण्याचे डबके साचले असताना संजय कंट्रक्शनकडून शासनाचे नियम धाब्यावर बसवून भर पावसात व रोडवर साचलेल्या डबक्याचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे. आतापर्यंत हे काम अधिकाऱ्यांच्या कमिशनच्या साखळीत अडकल्याची चर्चा गावात आहे. आताही शासनाने नियम धाब्यावर ठेवून १५ मे ते १५ सप्टेंबर या कालावधीत कामास मंजुरी देण्यात आली. आष्टी येथील सा. बां. विभागाचे उपविभागीय अभियंता लभाने यांच्या कार्यकाळातील हे काम असून ७ जून रोजी ते बदलून गेले. त्यानंतर सदर कार्यभार ९ जूनला विवेक पेन्दे यांच्याकडे आला असून कार्यकारी अभियंता जुमडे, मेहता यांच्या मार्गदर्शनात डांबरी रस्त्याचे कामास परवानगी देण्यात आली.
तळेगाव ते आष्टी-दुर्गवाडा या मार्गावर जागोजागी खड्डे व काही ठिकाणी रोड पूर्णपणे उखडला आहे. हे खड्डे न बुजाविता सदर उपविभागीय अभियंता पेन्दे यांना ६०० मिटर रोड बनविण्याची भर पावसाळ्यात घाई का झाली असा प्रश्न गामस्थांना पडला. सदर उपविभागीय अभियंता ९ जूनला आष्टी सा. बां. विभागात रूजू झाले. त्यांनी आल्या आल्या या रोडवर एक कंट्रक्शन कंपनी बि.यु.जी.चे काम करत असताना ते काम बंद केले. पण आजच्या तारखेला ६०० मीटर उष्णमिश्रीम डांबरीकरणाचे काम भर पावसाळ्यात सुरू केल्याने ग्रासस्थांनी ते बंद पाडले. विशेष म्हणजे सदर कामाचे मोजमाप पुस्तिकेवर येथून कार्यमुक्त झालेले लभाणे यांची स्वाक्षरी राहिल की पेन्दे यांची हे एक कोडेच आहे.(वार्ताहर)