नाचणगाव नाका ते पंचधारा रस्त्याचे काम थंडबस्त्यात
By Admin | Updated: June 11, 2016 02:27 IST2016-06-11T02:27:12+5:302016-06-11T02:27:12+5:30
शहरातून जाणाऱ्या हैदराबाद भोपाळ महामार्गास जोडणाऱ्या नाचणगाव नाका ते पंचधारा रोड या मार्गाच्या रूंदीकरणाचे काम दोन महिन्यांपूर्वी सुरू झाले होते.

नाचणगाव नाका ते पंचधारा रस्त्याचे काम थंडबस्त्यात
खोदकाम अर्धवट : रात्रीला अपघाताचा धोका
पुलगाव : शहरातून जाणाऱ्या हैदराबाद भोपाळ महामार्गास जोडणाऱ्या नाचणगाव नाका ते पंचधारा रोड या मार्गाच्या रूंदीकरणाचे काम दोन महिन्यांपूर्वी सुरू झाले होते. पण ६ ते ७ फुट रूंद व लांबलचक केलेले खोदकाम गत महिन्यापासून बंदच आहे. पावसाळा सुरू होण्यावर असल्याने या खड्यात पाणी साचून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधीत विभागाने रूंदीकरणाचे काम पूर्ववत सुरू करावे अशी मागणी व्यक्त होत आहे.
शहरातून जाणारा हैदराबाद भोपाळ मार्ग मुंबई हावडा या रेल्वे मार्गावरून जातो. पण रेल्वेफाटक तासनतास बंद राहत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. ती टाळण्यासाठी या रेल्वे क्रासिंगवर उडाण पुलाची मंजूरी मिळाली. सदर काम लवकरच सुरू होणार असल्याचेही खा. तडस यांनी सांगितले होते. या उड्डाण पुलाकडून येणारा मार्ग मुंबई-नागपूर या द्रुतगती मार्गाला जोडून तसेच पंचधारा रोडने वाहतूक वळविण्याच्या दृष्टीने नाचणगाव नाका ते द्रुतगती मार्गापर्यंत रूंदीकरणाचे कामही दोन महिन्यापूर्वी सुरू झाले. सदर काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते. ज्या कंत्राटदाराला काम देण्यात आले त्याने रस्त्याच्या रूंदीकरणाचे कामही सुरू केले. हे कंत्राट भागीदारामध्ये होते. पण या दोघांत वाद झाल्यामुळे काम रेंगाळल्याची चर्चा आहे.
द्रुतगती मार्गाकडून शहरात येणाऱ्या वाहनांची या मार्गावर वर्दळ असते. रात्री या मार्गावर फारशी प्रकाश व्यवस्था नसल्यामुळे सुरू असलेल्या या मार्गाच्या रूंदीकरणाच्या अर्धवट कामामुळे अपघाताची शक्यता वर्तविल्या जात आहे. शिवाय डांबरी रस्त्यालगतच सुरू असलेल्या एक ते दीड फूट खोलगट भागात वाहन घसरण्याची शक्यता आहे. शिवाय काम सुरू असल्याची कुठलीही सूचना लिहिलेली नाही. रात्रीला खोदकाम दिसून येत नाही. त्यामुळे सदर रस्ता रूंदीकरणाचे काम त्वरीत सुरू करावे अशी मागणी प्रवासी व्यक्त करीत आहे.(तालुका प्रतिनिधी)