प्रामाणिकपणे काम करणे हीच खरी देशसेवा
By Admin | Updated: May 12, 2014 00:07 IST2014-05-12T00:07:50+5:302014-05-12T00:07:50+5:30
देशसेवा करण्यासाठी आपण ज्या क्षेत्रात किंवा व्यवसायात आहोत ते काम मनापासून करा. जीवनात प्रामाणिकपणा, शिस्त, कर्तव्यदक्षता व सकारात्मक दृष्टिकोन महत्वाचा आहे.

प्रामाणिकपणे काम करणे हीच खरी देशसेवा
ंवर्धा : देशसेवा करण्यासाठी आपण ज्या क्षेत्रात किंवा व्यवसायात आहोत ते काम मनापासून करा. जीवनात प्रामाणिकपणा, शिस्त, कर्तव्यदक्षता व सकारात्मक दृष्टिकोन महत्वाचा आहे. प्रामाणिकपणे आपले काम करणे हीच खरी देशसेवा आहे. या दृष्टिकोनातून प्रहारचे शिबिर व संस्कार प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी केले. डॉ. जे. सी. कुमारप्पा आश्रम, पवनार येथे प्रहारच्या पाच दिवसीय साहस शिबिराच्या समारोपाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अॅड. राजेंद्र खरे, कुमारप्पा सेंटरच्या संचालिका सिस्टर नीता, प्रहारचे उपाध्यक्ष प्रदीप दाते, डॉ. राजेंद्र बोरकर, वागदरकर व प्रहार संस्थेचे अध्यक्ष तथा होमगार्ड्सचे जिल्हा समादेशक लेफ्टनंट प्रा. मोहन गुजरकर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात २१ प्रकारच्या अडथळा पार सैनिकी प्रशिक्षणाच्या प्रात्यक्षिकांनी झाली. या प्रसंगी शहीदों की चिताओं पर खडी हुई स्वतंत्रता या देशभक्तीपर गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शिबिरात विदर्भातून ५५ मुलामुलींचा सहभाग होता. आपल्या भाषणात पारस्कर यांनी शालेय मुलामुलींना पंचसुत्री अंगीकारण्यास सांगितले. ज्यात ट्रॅफिकचे नियम पाळण्याकरिता आपल्या पालकांमध्ये जागरूकता निर्माण करा, आपल्या प्रत्येक वाढदिवसाला एक झाड लावा व त्याचे संगोपन करा, शिस्तीला जीवनात प्रथम स्थान द्या, पिण्याचे पाणी जपून वापरा व इतरांमध्ये जागृती निर्माण करा व प्रामाणिकतेला जपा या मुल्यांचा समावेश होता. अॅड. राजेंद्र खरे म्हणाले, प्रहारच्या प्रशिक्षणातून हिंमत, राष्ट्रप्रेम व शिस्त निर्माण होऊन सैनिकी मानसिकता निर्माण होत असल्याचे सांगितले. प्रास्ताविकात प्रा. गुजरकर यांनी नव्या पिढीमध्ये सैनिकी जीवनाबद्दल आवड निर्माण करण्याचा प्रयत्न या शिबिरात केल्याचे सांगितले. शिबिरादरम्यान नितीन भोगल व वकारे यांनी दुर्मिळ नाण्यांचे प्रदर्शन भरवून शिबिरार्थ्यांना व पालकांना त्याबाबत माहिती विषद केली. श्याम देशपांडे व डॉ. जैन यांनी कथाकथन करून वाचनाचे महत्व सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये पक्ष्यांबद्दल प्रेम निर्माण करण्याकरिता टाकाऊ वस्तूंपासून घरटे बनविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. शिबिरात अडथळा पार प्रशिक्षण, किल्ले तयार करणे, रॉक क्लाईंबिंग, रॅपेलिंग, व्हॅली क्रासिंग, ट्रेझर हंट, जंगल ट्रेकिंग, बौद्धिक खेळ, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व कला, नाट्य कला व विविध साहसी उपक्रमांचा समावेश होता. पाणी वाचवा चित्रकला स्पर्धेत प्राजक्ता रासेकर, आदिती गजभिये व हितेश हांडे यांनी तर वन्यजीव वाचवा चित्रकला स्पर्धेत आर्या पुनसे, शिवाजी मौर्य व शांभवी पुंडलिक यांना क्रमांक मिळविले. संचालन प्रा. गुजरकर यांनी तर आभार संतोष तुरक यांनी मानले यशस्वीतेकरीता वैशाली गुजरकर, अमोल तडस, सातपुते, फुलझेले, आदींनी प्रयत्न केले.(शहर प्रतिनिधी)