प्रशासकीय कारवाईच्या आश्वासनावर ग्रामसेवक कामावर
By Admin | Updated: March 6, 2016 02:13 IST2016-03-06T02:13:20+5:302016-03-06T02:13:20+5:30
गत १९ दिवसांपासून ग्रामसेवकांनी लेखणीबंद आंदोलन पुकारले होते. यामुळे ग्रामविकासाची कामे खोळंबली होती.

प्रशासकीय कारवाईच्या आश्वासनावर ग्रामसेवक कामावर
जिल्हाधिकाऱ्यांची मध्यस्थी : ग्रामसेवक दुपारपासून कार्यस्थळी रूजू
वर्धा : गत १९ दिवसांपासून ग्रामसेवकांनी लेखणीबंद आंदोलन पुकारले होते. यामुळे ग्रामविकासाची कामे खोळंबली होती. यात शनिवारी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या मध्यस्थीने जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी संजय मीणा यांच्या उपस्थितीत ग्रामसेवकांशी चर्चा झाली. या चर्चेत शहरालगतच्या ११ ग्रामपंचायतीची चौकशी प्रशासकीय नियमानुसार करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. या आश्वासनावर ग्रामसवेकांनी आंदोलन मागे घेतले असून दुपारपर्यंत आपापल्या कार्यस्थळी रूजू होणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुंदन वाघमारे यांनी दिली.
ग्रामसेवकांच्या लेखणीबंद आंदोलनामुळे जिल्हातील सर्वच ग्रामपंचायतीची कामे खोळंबली होती. याचा त्रास सर्वसामान्यांना होत होता. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने आंदोलनात सहभागी ग्रामसेवकांना त्यांच्यावर वेतन कपातीची कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. शिवाय त्याची नोंद त्यांच्या सेवापुस्तिकेत करण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यांना शुक्रवारपासून कामावर रूजू होण्याच्या सूचना असताना तीन ग्रामसवेक वगळता कुणीही कामावर गेले नाही. यामुळे अखेर जिल्हाधिकाऱ्यांना या आंदोलनात हस्तक्षेप करावा लागला. जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी सीईओ यांच्यासह आंदोलन मंडपाला भेट दिली. येथे त्यांनी सर्वसामान्यांना या आंदोलनाचा त्रास होत असल्याचे म्हणत आंदोलन मागे घेण्यासंदर्भात ग्रामसेवकांना सांगितले.
यावर ग्रामसेवक संघटनेने त्यांच्या मागण्या त्यांच्या समक्ष ठेवल्या. यातील होणारी कारवाई जिल्हा परिषदेच्यावतीने प्रशासकीय पद्धतीने करावी, ही मागणी मान्य केली. शिवाय शहरालगत असलेल्या ११ ग्रामपंचायतीची चौकशी प्रशासकीय पद्धतीने करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावर ग्रामसेवकांनी त्यांचे आंदोलन मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर केले. तसेच रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करून देण्याचे आश्वासन ग्रामसेवकांनी सीइओ मीणा यांना दिले. त्यांनीही ग्रामसेवकांवरील वेतन कपातीची कारवाई मागे घेण्यात येत असल्याचे मान्य केल्याचे संघटनेने सांगितले. तर या बाबीला सीईओ मीणा यांनी दुजोरा दिला.(प्रतिनिधी)