५०१ ग्रामपंचायतींनी जलसंधारणासाठी घेतला श्रमदानाचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 21:35 IST2019-07-04T21:34:41+5:302019-07-04T21:35:12+5:30
जलसंधारणाच्या कामात ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढवून घेण्याच्या उद्देशाने २२ जूनला वर्धा जिल्ह्यातील ५१९ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेण्याच्या सूचना जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी आठही गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

५०१ ग्रामपंचायतींनी जलसंधारणासाठी घेतला श्रमदानाचा ठराव
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जलसंधारणाच्या कामात ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढवून घेण्याच्या उद्देशाने २२ जूनला वर्धा जिल्ह्यातील ५१९ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेण्याच्या सूचना जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी आठही गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. याच सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन जिल्ह्यातील तब्बल ५०१ ग्रा.पं.मध्ये महिन्याच्या चौथा शनिवार असतानाही ग्रामसभा पार पडल्या. या ग्रामसभांमध्ये जलसंधारणासाठी श्रमदानाचा ठराव एकमताने घेण्यात आला आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात जलसंवर्धनासाठी एक मोठी लोकचळवळच उभी होऊ पाहत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.
यंदाच्या वर्षी वर्धा जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्याचे वास्तव आहे. याच पार्श्वभूमीवर पावसाच्या पाण्याचे योग्य पद्धतीने संवर्धन कसे करता येईल, शिवाय नागरिकांना ‘जल ही जीवन है’ हे पटवून देण्यासाठी जिल्ह्यातील ५१९ ग्रा.पं. मध्ये ग्रामसभा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. शिवाय याच ग्रामसभांदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्राचे वाचन करणे क्रमप्राप्त होते. वर्धा जिल्ह्यातील ५१९ ग्रा.पं.पैकी ५०१ ग्रा.पं. मध्ये २२ जून या एकाच दिवशी ग्रामसभा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्राचे वाचन करण्यात आले आहे. तर उर्वरित १८ ग्रा.पं. मध्ये निवडणुकीची आचार संहिता लागू असल्याने ग्रामसभा होऊ शकल्या नाही.
१८ ग्रा.पं. मध्ये आचारसंहितेचा परिणाम
२२ जूनला पं.स. आष्टी अंतर्गत एक तर सेलू पं.स. अंतर्गत येणाºया १७ अशा एकूण १८ ग्रा.पं. मध्ये ग्रामपंचायतीची आचार संहिता लागू असल्याने या ग्रा.पं. मध्ये ग्रामसभा होऊ शकली नाही.