दारूविक्री विरोधात महिलांचा मोर्चा
By Admin | Updated: July 31, 2016 00:50 IST2016-07-31T00:50:28+5:302016-07-31T00:50:28+5:30
अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्यावतीने जिल्हातील अवैध दारूविक्री व महिलांवरील

दारूविक्री विरोधात महिलांचा मोर्चा
जनवादी महिला संघटनेचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन
वर्धा : अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्यावतीने जिल्हातील अवैध दारूविक्री व महिलांवरील अत्याचाराविरोधात जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला.
अनेक मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात आले. यात प्रामुख्याने वर्धा जिल्ह्यातील अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करावी तथा अवैध दारूचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली. अनेक गावांत जनवादी महिला संघटनेच्या महिला पुढकाराने दारूबंदी करतात; मात्र पोलिसांचे सहकार्य मिळत नसल्याने महिलांना त्रास सहन करावा लागतो. वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असली तरी जिल्ह्याशेजारील नागपूर, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात दारू खुली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील परवानाधारक दारूविक्रेत्यांवर गुन्हे नोंदवावे. जिल्ह्याच्या विविध शासकीय कार्यालय व पोलीस विभागातील अनेक कर्मचारी मद्यप्राशन करून कामावर येतात. यामुळे कामे प्रभावित होतात. कार्यरत महिला कर्मचाऱ्यांनाही याचा त्रास होतो.
वर्धा पाटबंधारे विभाग आणि अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालय, येथे तर दारूच्या पार्ट्या होत असल्याच्या घटना उघड झाल्या होत्या. अश्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. विक्रेत्यांवर वचक बसण्यासाठी अवैध दारूविक्रीचा गुन्हा अजामीनपात्र आणि १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद करावी, दारूची केस सत्र न्यायालयात चालवावी, तीनदा अवैध दारू विकताना सापडल्यास दारूविक्रेत्यास हद्दपार करावे. दारूबंदीचे कार्य करणाऱ्या जनवादी महिला संघटनेच्या महिलांचा ओळखपत्र द्यावे. पोलीस ठाण्यात सन्मानाची वागणूक मिळावी, त्यांच्या तक्रारीची त्वरित दखल घ्यावी, आदी मागण्याही निवेदनात करण्यात आल्या. कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना त्वरित शिक्षा व्हावी म्हणून हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा. दादर येथील डॉ. आंबेडकर यांचे निवासस्थान व बुद्धभूषण पे्रसची इमारत पाडणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, जिल्ह्यातील सर्व पिवळ्यआ रेशन कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळावे, एपीएल, बीपीएल, अंत्योदय, तसेच पिवळ्या कार्डधारकांची लक्ष आधारित यादी रद्द करून सर्व कार्डधारकांना प्रत्येक कार्डावर ३५ किलो धान्य सवलतीचे दरता वितरित करावे. मदना येथील उमा चाफले, या विधवेचा छळ करणाऱ्या नरेश चाफले, रमेश चाफले अनूप धोपटे व संजय चाफले यांच्यावर कडक कारवाई व्हावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. संघटनेच्या राज्या उपाध्यक्ष प्रभा घंगारे, जिल्हाध्यक्ष प्रतिभा हाडके, जिल्हा सचिव दुर्गा काकदे यासह शेकडो महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.(शहर प्रतिनिधी)