महिला आरक्षणाचा दिग्गजांना हादरा
By Admin | Updated: October 6, 2016 00:33 IST2016-10-06T00:33:24+5:302016-10-06T00:33:24+5:30
जिल्ह्याचे लक्ष असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षणाची बुधवारी सोडत झाली

महिला आरक्षणाचा दिग्गजांना हादरा
जिल्हा परिषदेसह पंचायत समिती आरक्षणाची सोडत : नव्या गट-गणांत महिलांनाच संधी
वर्धा: जिल्ह्याचे लक्ष असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षणाची बुधवारी सोडत झाली. आरक्षणाच्या नव्या नियमात ५० टक्के जागा महिलांना देण्याचा नियम अनेकांच्या आशांवर पाणी फेरणारा ठरला. महिला आरक्षणामुळे जिल्ह्यातील दिग्गजांना फटका बसल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात नव्याने तयार झालेले पाच गट व गणात महिलांची वर्णी लागल्याने येथे आपली जागा शोधणाऱ्यांच्या आशाही मावळल्या.
सर्वांचे लक्ष असलेल्या तळेगाव (टा), अल्लीपूर, वायफड, तरोडा, नाचणगाव, इंझाळा, येळाकेळी व वडनेर या गटाच्या जागा महिलांकरिता राखीव झाल्याने या भागात कायम वर्चस्व राखणाऱ्या दिग्गजांच्या तोंडचे पाणी पळाल्याचे चित्र विकास भवनात दिसून आले. तर जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्ष चित्रा रणनवरे यांचा हिंगणी व विद्यमान उपाध्यक्ष विलास कांबळे यांचा सावंगी (मेघे) गट खुल्या प्रवर्गाकरिता राखीव झाला आहे. गत पंचवार्षिकेत संधी हुकलेल्या काहींना नव्या आरक्षणाने तारल्याने त्यांच्या आशा पल्लवित झाल्याचे दिसून आले. बुधवारी निघालेल्या नव्या आरक्षणामुळे राजकीय पक्षांनी या भागात आपले वर्चस्व कायम राखण्याकरिता उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेत नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सुकळी (स्टेशन), वरूड, पवनार, सालोड (हिरापूर) व जाम या पाचही गटात महिलांची वर्णी लागली आहे.
विकास भवनात गटाचे आणि आठही पंचायत समिती स्तरावर दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या उपस्थितीत आरक्षणाची सोडत निघाली. आरक्षण काढताना सर्वप्रथम नियम सांगण्यात आले. यात शासनाच्या निर्देशानुसार, ५२ पैकी सात जागा अनुसूचित जातींकरिता राखीव इेवत त्यातील चार जागा महिलांकरिता राखीव ठेवण्यात आल्या. याच नियमानुसार अनुसूचित जमातीकरिता सात जागा राखीव ठेवत त्यातील चार जागा महिलांकरिता आरक्षित करण्यात आल्या. यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्गातील आरक्षणाची सोडत काढण्यात आली. या प्रवर्गाकरिता १४ जागा देण्यात आल्या. त्यातील सात जागा महिलांकरिता राखीव ठेवण्यात आल्या. यानंतर उर्वरीत २४ जागा खुल्या प्रवर्गाकरिता राखीव करण्यात आल्या. यातील ११ जागा महिलांकरिता राखीव ठेवण्यात आल्या.
विकास भवनात सुरू असलेल्या आरक्षण सोडतीच्यावेळी जिल्हा परिषदेचे आजी माजी दिग्गजांची उपस्थिती होती. यावेळी काही सदस्यांनी सुरू असलेल्या आरक्षण सोडतीच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला. मात्र जिल्हाधिकारी नवाल यांनी त्यांच्या समस्येचे निराकरण करीत आरक्षण सोडतीचे कार्य पार पाडले. आरक्षण जाहीर होताच विकास भवनाच्या आवारात ज्यांचे गट महिलांकरिता राखीव झाला त्यांनी नाराजी व्यक्त करीत नव्या गटाचा शोध सुरू करणार असल्याचे बोलून दाखविले. तर काहींनी पक्ष काय सूचना देतो यावर आपली भूमिका ठरणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)