रेहकी ग्रामपंचायतीवर महिला धडकल्या
By Admin | Updated: October 9, 2016 00:34 IST2016-10-09T00:34:16+5:302016-10-09T00:34:16+5:30
तालुक्यातील रेहकी येथील स्वस्त धान्य दुकानदार शालीग्राम चाफले याला गरिबांच्या हक्काचे धान्य काळ्या बाजारात ..

रेहकी ग्रामपंचायतीवर महिला धडकल्या
स्वस्त धान्य दुकानप्रकरण : ठरावाबाबत सरपंचांना विचारला जाब
सेलू : तालुक्यातील रेहकी येथील स्वस्त धान्य दुकानदार शालीग्राम चाफले याला गरिबांच्या हक्काचे धान्य काळ्या बाजारात विकताना तहसीलदारांनी रंगेहात पकडत त्याच्यावर कारवाई केली. आता याच दुकानादाराला ते दुकान परत मिळण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. याला कारण ग्रामसभेचा ठराव असल्याने महिलांनी या ठरावाबाबत जाब विचारण्याकरिता शनिवारी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा नेला.
यावेळी संतप्त नागरिकांनी सरपंचांना तहकुब ग्रामसभेत भ्रष्टाचारी दुकानदाराला मदत करणारा ठराव कसा दिला याचा जाब विचारला. यावेळी सरपंच रोशनी झाडे व मोर्चातील महिलांत शाब्दीक चकमक उडाली. सरपंचांनी महिलांना अपेक्षित उत्तर दिले नसल्याने महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या मांडला. शुक्रवारी तहसील कार्यालयावर एल्गार पुकारल्यावर शनिवारला महिला ग्रामपंचायतवर धडकल्या. यावेळी सरपंच रोशनी झाडे यांनी महिलांशी उद्धटपणे बोलत तू-तू मै-मै केली. दिलेला ठराव रद्द करावा ही महिलांची मागणी होती; मात्र सरपंच झाडे यांनी महिलांशी वाद घालत चर्चा पूर्ण करण्याऐवजी ग्रामपंचात सोडली. अखेर उपसरपंच हरि झाडे यांनी १२ आॅक्टोबरला ग्रामसभा बोलवून निर्णय घेवू, असा सामोपचाराने मार्ग काढल्याने महिलांचा ताफा शांत झाला. विशेष म्हणजे शुक्रवारला महिला व पुरुषांनी मोर्चा काढीत शासनाच्या या निर्णयाविरोधात तहसीलदारांना निवेदन दिले होते.
येथील चाफले नामक दुकानदाराने गरजवंतांकरिता आलेले धान्य काळ्या बाजारात विकल्यामुळे रेहकीवासीयांनी या स्वस्त धान्य दुकानाचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याची मागणी केली होती. या प्रकरणावर सुनावणी सुरू असताना उपायुक्त (पुरवठा) नागपूर यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचा ठराव अप्राप्त असल्याचे कारण देत हे स्वस्त धान्य दुकान पुन्हा ‘त्या’ भ्रष्टाचारी दुकानदाराला देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयासाठी रेहकी ग्रामपंचायतीने तहकुब ग्रामसभेचा भ्रष्टाचारी दुकानदाराच्या समर्थनार्थ ठराव दिला होता. यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.(तालुका प्रतिनिधी)