दारूबंदी मंडळाच्या महिलांना विके्रत्यांकडून धमकी
By Admin | Updated: March 23, 2015 01:49 IST2015-03-23T01:49:56+5:302015-03-23T01:49:56+5:30
येथील तहसील कार्यालय जवळच्या तेलंगखेडी परिसरात धरणे देवून दारूबंदी राबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला मंडळ व साई महिला बचत गटच्या सदस्यांसह ...

दारूबंदी मंडळाच्या महिलांना विके्रत्यांकडून धमकी
हिंगणघाट : येथील तहसील कार्यालय जवळच्या तेलंगखेडी परिसरात धरणे देवून दारूबंदी राबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला मंडळ व साई महिला बचत गटच्या सदस्यांसह त्यांच्या परिवाराला अवैध दारू विक्रेत्यांकडून भीती दाखविली जात आहे. शिवाय त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्नही करण्यात येत आहे. पोलीस शहानिशा न करता आंदोलनकर्त्यावर गुन्हा दाखल करीत असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी महिला मंडळाचेवतीने पत्रकार परिषदेत रविवारी केली आहे.
वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असताना हिंगणघाट शहरात दारूची सर्रास विक्री होत असून तेलंगखेडी परिसर याकरिता प्रसिद्ध आहे. या परिसरात जवळपास २० दुकाने असून यात चार मोठ्या दुकानांचा समावेश आहे. या परिसरातील अवैध दारू विक्रीमुळे अनैतिक प्रकार वाढले आहे. येथील महिला मंडळाने या परिसरात दारूबंदीचा फलक लावला असून या फलकजवळ महिला मंडळ व बचत गटाच्या सदस्या दारू पिण्यासाठी येणाऱ्यांना परतवून लावत आहे. यामुळे बिथरलेले दारू विक्रेते या महिलांच्या मुला, मुलींना तसेच पुरूष मंडळींना जीवे मारण्याची धमकी देणे, अंगावर मोटार सायकल नेणे तसेच अश्लिल शिवीगाळ करीत असल्याचे प्रकार करीत आहे. या प्रकाराची पोलीस दखल न घेता महिला मंडळाच्या सदस्यांना दमदाटी करीत असल्याचा आरोप महिलांचा आहे.
या संदर्भात विभागाकडे अनेक निवेदन देवून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले असले तरी कारवाई मात्र झाली नाही. ८ दिवसापूर्वी प्रमोद नगरवार यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती यावेळी महिलांनी दिली. या पत्रपरिषदेला नगरसेविका शारदा पटेल, महिपाल रामटेके, भावना नगरवार, प्रमोद नगरवार व परिसरातील महिलांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)
दारू विक्रेत्यांना तडीपार करा
या परिसरात पोलीस चौकी द्यावी, येथील अवैध दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल असले तरी त्याचा यांच्यावर कुठलाही परिणाम होत नाही. त्यामुळे या दारू विक्रेत्यांवर तडीपारीची कारवाई करण्यात यावी. महिला मंडळाच्या परिवाराला संरक्षण देवून दाखल खोट्या केसेस खारीज करण्यात याव्या व या परिसरात दारूबंदी मोहीम राबवून परिसर दारूमुक्त करण्याची मागणी महिलांनी केली आहे.