महिला काँग्रेसही पुरूषांच्या बरोबरीने दिसणार!
By Admin | Updated: November 5, 2015 02:27 IST2015-11-05T02:27:32+5:302015-11-05T02:27:32+5:30
जगात ५० टक्के महिला आहेत. काँग्रेसने महिलांना कधीही दूर ठेवले नाही. राजीव गांधींनंतर नेत्या सोनिया गांधी यांनीसुद्धा

महिला काँग्रेसही पुरूषांच्या बरोबरीने दिसणार!
राजेश भोजेकर ल्ल वर्धा
जगात ५० टक्के महिला आहेत. काँग्रेसने महिलांना कधीही दूर ठेवले नाही. राजीव गांधींनंतर नेत्या सोनिया गांधी यांनीसुद्धा महिलांना सत्तेत ५० टक्के आरक्षणांचा वाटा दिला. यापुढे महिला काँग्रेसही काँग्रेस कमिटीच्या खांद्याला खांदा लावून पक्षाची धुरा वाहताना दिसणार आहे. युवती काँग्रेसची स्थापना व झोन अध्यक्षांच्या नियुक्त्या याचाच एक भाग असेल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष चारूलता टोकस यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना दिली.
महिला संघटन पाहिजे तसे मजबूत नाही. संघटनेला बळ देण्यासाठी काही जुन्या सक्षम पदाधिकाऱ्यांना कायम ठेवणार असून लवकरच नव्या पदाधिकारी व प्रभारीच्या नियुक्त्या केल्या जातील. गाव, तालुका, बुथनिहाय संघटनात्मक बांधणीवर भर असेल. पद घेऊन शांत बसणाऱ्यांना वाव नाही. प्रत्येक पदाधिकाऱ्यांना एक ‘फॉरमॅट’ दिला असून त्यामध्ये प्रत्येक महिन्यात केलेल्या कामाचा अहवाल त्यांना सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आठवड्यात किमान चार महिलांचे मत काँग्रेसकडे वळविण्याची जबाबदारी प्रत्येकाकडे सोपविली आहे, असेही टोकस म्हणाल्या.
युपीए १ व २ च्या कार्यकाळात केंद्र व महाराष्ट्रात महिलांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात आल्या. त्यावर जागृती केली जाणार आहे. महिलांचा सामाजिक दर्जा उंचावणे, हे उद्दिष्ट यापुढे असणार आहे. बचत गट प्रशिक्षणावरही भर असणार आहे. केंद्रात व राज्यात सत्तांतर झाले. नव्या सरकारला संधी देणे भाग होते. यामुळे काँग्रेसने सुरुवातीच्या काळात बघ्याची भूमिका घेतली. नव्या सरकारच्या काळात महागाईने डोके वर काढले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झालेले आहे. महिलांबाबत उदासीनता बाळगल्याचे दिसून येते, असा आरोपही त्यांनी केला. दिल्लीत राहते, हा आरोप साफ खोटा आहे. यापूर्वी अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीचे कार्यकारिणी सदस्य होते. दरम्यान, पक्षश्रेष्ठींनी निवडणुकीच्या काळात मोठी जबाबदारी दिली होती. जम्मू व इतर राज्यात पक्षाचे काम करीत होते. आता पूर्णवेळ मुंबईला स्थायिक झाले आहे. मुंबईत असले तरी सतत राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहे. जेव्हापासून नेते राहुल गांधी, सोनिया गांधी व महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रभा ओझा यांनी प्रदेध्याक्षाची जबाबदारी दिली, तेव्हापासूनच राज्यात प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली आहे. ३१ आॅक्टोबरला उस्मानाबाद येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांसाठी ‘महिला दुष्काळ परिषद’ हा पहिला कार्यक्रम होता.
आगामी निवडणुकांमध्ये महिलांना तिकीट देताना ती नेत्यांची मुलगी वा पत्नी आहे, ही पात्रता लक्षात घेतली जाणार नाही. स्व-कर्तृत्वावर स्वत:ची वेगळी छाप पाडणाऱ्या महिलांनाच प्राधान्य दिले जाईल. युवक काँग्रेसप्रमाणे युवतींनाही पुढे आणण्याचा प्रयत्न आहे. अन्यायग्रस्त, पीडित महिलांना न्याय देण्यासाठी ‘हल्लाबोल कमिट्या’ स्थापन करण्यात येणार आहे. सोबतच महिला व्यावसायिक व स्वयंसेवी संस्थांचेही सेल कार्यान्वित होणार आहे. मोठ्या शहरांत महिला काँग्रेस कमिटीचा भार अध्यक्ष या नात्याने एकाच महिलेवर असतो. तो कमी व्हावा, यासाठी झोननुसार जबाबदाऱ्या निश्चित केल्या जाईल. या अनुषंगाने आगामी काळात महिला काँग्रेस कमिटी पुरूष संघटनांच्या बरोबरीने दिसणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
वारसाहक्क असता तर केव्हाच आमदार-खासदार झाले असते
४प्रभाताई राव यांची मुलगी असल्याचा अभिमान आहे; पण त्यांच्या बळावर राजकारणात आले नाही. लोकांनी जि.प. सदस्य म्हणून निवडून दिले. नंतर सदस्यांनी जि.प. अध्यक्षासाठी निवड केली. युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्षाची धुरा सांभळलेली आहे. इतकेच नव्हे, तर प्रदेश प्रतिनिधी म्हणून पीसीसीवर निवडून दिले होते. प्रभाताई राव प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी सात जणांना विधान परिषदेवर पाठविले होते. मुलगी म्हणून त्यांनी तेव्हाच ही संधी दिली असती. २००९ मध्ये प्रभातार्इंना खासदारकीची तिकीट मागविली होती. तेव्हा त्यांनी मला तिकीट नाकारली. त्यांचे निधन होऊन साडेपाच वर्षे झाली असताना वारसाहक्क म्हणून हे पद मिळाल्याचा आरोप साफ चुकीचा आहे. पक्षात आतापर्यंत जी भूमिका बजाविली, काँग्रेस अडचणीत असताना राहुल, सोनिया गांधी, प्रभा ओझा व अशोक चव्हाण यांना मी सक्षम वाटले असेल म्हणूनच त्यांनी ही जबाबदारी दिली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.