मघा गरजले; पण मळणीपर्यंत खरिपाची चिंता
By Admin | Updated: September 6, 2014 02:15 IST2014-09-06T02:15:39+5:302014-09-06T02:15:39+5:30
मघा नक्षत्र गरजले की पुढील येणाऱ्या नक्षत्रामध्येही पाऊस बसरतो, असा अंदाज आणि पूर्वानुभव वयोवृद्ध नागरिक कथन करतात़ यामुळे पिकांची मळणी होईस्तोवर

मघा गरजले; पण मळणीपर्यंत खरिपाची चिंता
विजय माहुरे घोराड
मघा नक्षत्र गरजले की पुढील येणाऱ्या नक्षत्रामध्येही पाऊस बसरतो, असा अंदाज आणि पूर्वानुभव वयोवृद्ध नागरिक कथन करतात़ यामुळे पिकांची मळणी होईस्तोवर खरीप हंगाम धोक्यातच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे़
कोल्हा वाहन असलेल्या मघा नक्षत्राने साथ दिली असली तरी १६ आॅगस्टपासून सुरू झालेले हे नक्षत्र २९ ला संपले़ या दिवसांत मेघगर्जना सातत्याने झाली व पाऊसही आला़ या गर्जनेमुळे माघ, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा या सर्व नक्षत्रांमध्ये कमी-अधिक का होईना; पण पाऊस येतोच, असा पक्का अंदाज आहे़ मघा संपताच मोर वाहन असलेले पूर्वा नक्षत्र ३० आॅगस्टपासून सुरू झाले अन् सतत पाऊस सुरू आहे़ १३ सप्टेंबरपासून उत्तरा, २७ पासून हस्त नक्षत्र तर १० आॅक्टोबरपासून चित्रा नक्षत्र सुरू होत आहे़ चित्रा नक्षत्रात दिवाळी हा सण येतो आणि हाच हंगाम खरिपातील पिकांच्या मळणी व सवंगणीचा असतो़ मागील वर्षीही सोयाबीन सवंगणीनंतर भिजली होती़ यामुळे शेतकऱ्यांना मोठ्याच नुकसानाला सामोरे जावे लागले होते़
वृद्ध शेतकऱ्यांचा पावसाचा अंदाज खरा ठरल्यास, मृग व रोहिणी नक्षत्रात ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी पेरलेल्या कपाशीला लागलेली बोंडे सततच्या पावसाने काळी पडतील आणि उन्ह न मिळाल्यास ती फुलणार नाही़ यामुळे पावसाने दडी मारल्यानंतरही जीवाचा आटापिटा करून जोपासलेल्या पिकांपासून मिळणाऱ्या उत्पन्नापासून मुकण्याची वेळ येण्याची शक्यता राहणार आहे़ खरीपात सोयाबीन व कपाशी ही दोन मुख्य पिके असतात़ तुरीचाही यात समावेश असतो; पण सोयाबीनच्या झालेल्या दुबार व तिबार पेरणीमुळे सोयाबीनची सवंगणी याच चित्रा नक्षत्रात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे़
सोयाबीन फुलावर आली असली तरी पहिल्या पेरणीच्या कपाशीला बोंडे लागली आहे़ यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात चिंतेचे वातावरण असणे स्वाभाविक आहे़ आश्लेषा नक्षत्रात बहुतांश शेतकऱ्यांनी पिकांना डवरणी दिली; पण मघा नक्षत्रात सतत आलेल्या पावसामुळे शेतात तणाने थैमान घातले़ पिकापेक्षा तण वाढले; पण निंदण करून देणाऱ्या मजुराची संख्या कमी असल्याने मजूर मिळणासे झाले आहे़ यातच सणासुदीचे दिवस आल्याने शेतकरी आणखीच अडचणीत सापडले आहे़
मघा ते चित्रा नक्षत्रादरम्यान सतत पाऊस आल्यास कोरडवाहू क्षेत्र शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा देणार आहे; पण पाणबसन कृषी क्षेत्रातील पिकांना मघा नक्षत्रात आलेला पाऊस वरदान ठरला आणि दोन्ही क्षेत्रातीत पिकांची खुंटलेली वाढ पुन्हा होऊ लागल्याचे दिसते़ यातच पूर्वा नक्षत्रामध्ये आलेल्या पावसाने पूढील नक्षत्रातही सतत पाऊस राहणार असल्याची चुणूक दाखविली आहे़ निसर्गावर अवलंबून असणारा शेतकरी अशा जुन्या अनुभवांवरच शेती करीत असतात़ आजही आजोबांनी सांगितलेल्या काही गोष्टी आपल्याकडील चिमुकल्यांना सांगितल्या जातात़ यापैकी चावडीवर बसलेल्या वयोवृद्धांशी गप्पा सुरू असताना मघा नक्षत्रात सतत मेघगर्जना झाल्यास या पाचही नक्षत्रात पाऊस येतोच असा सूर उमटला़
हवामान खात्याचा अंदाज कधी खरा तर कधी खोटाही ठरल्याचा अनुभव आहे़ या दरम्यानचा पाऊस उघडीप देणारा राहिल्यास तो पिकांना वरदान ठरेल; पण पावसाचे सातत्य कायम राहिल्यास तो पिकांच्या नुकसानास कारणीभूत ठरू शकतो़
सलग तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना अस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करावा लागत आहे़ शेती हा व्यवसाय सातत्याने तोट्याचा ठरत आहे़ यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या हवालदिल झाला आहे़ दुबार व तिबार पेरणी झाल्याने मिळालेले बँकेने दिलेल्या पीक कर्जाची रक्कम संपली़ घरची लक्ष्मी बचत गटाची सदस्य असल्याने तेथूनही कर्ज घेतले; पण शेतात उभे असणारे पीक अस्मानी संकटात सापडले असताना मळणी सुस्थितीत झाल्यास सुलतानी संकट तरी येऊ नये, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे़
पोळा सणावर आर्थिक संकट दिसून आले़ आता श्री गणेशाची स्थापना घरोघरी झाली आहे़ या उत्सवावरही ग्रामीण भागात विरजण पडल्याची स्थिती आहे़ नवरात्र, दसरा आणि दिवाळी हे सण अवघ्या एक महिन्यावर आहे़ एक महिन्यात शेतकऱ्याजवळ पैसा येईल, असे कोणतेही पीक नाही़ यामुळे ग्रामीण भागात होणारी आर्थिक उलाढाल मंदावल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळते़
ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था डगमगली असून बँकेत सुवर्ण तारण योजनेचे कर्ज उचलण्यासाठी शेतकरी महिला-पुरूषांची गर्दी झाल्याचे चित्र सेलू तालुक्यात निर्माण झाले आहे़