कर्जमाफीशिवाय स्वस्थ बसणार नाही
By Admin | Updated: March 31, 2017 01:48 IST2017-03-31T01:48:32+5:302017-03-31T01:48:32+5:30
देशाला दिशा देण्याचे काम या वर्ध्यातून झाले आहे. वर्ध्यातूनच शेतकऱ्यांच्या हा कर्जमुक्तीचा लढा तीव्र करण्याचा इशारा

कर्जमाफीशिवाय स्वस्थ बसणार नाही
बापूकुटी व परमधाम आश्रमातून उर्जा घेत संघर्ष यात्रा रवाना
सेल : देशाला दिशा देण्याचे काम या वर्ध्यातून झाले आहे. वर्ध्यातूनच शेतकऱ्यांच्या हा कर्जमुक्तीचा लढा तीव्र करण्याचा इशारा गुरूवारी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे दिला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असेही त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले. सेलू येथे संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
व्यासपीठावर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, आ. रणजित कांबळे, सुनील केदार, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जयंत पाटील, जयदत्त क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड, माजी आ. राजू तिमांडे, जि.प.चे माजी अध्यक्ष पप्पू जयस्वाल ही नेतेमंडळी विराजमान होती.
विखे पाटील पुढे म्हणाले, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तरतूद करण्याचा आग्रह धरणाऱ्या आमदारांना भाजपा सरकारने निलंबित केले. अहमदाबाद मुंबई मेट्रो ट्रेनची राज्याला गरज नसताना त्यावर या सरकारने ७५ हजार कोटी रूपये खर्चाची तरतूद केली. देश सोडून पळालेल्या माल्ल्याचे ६ हजार कोटी, उद्योग पतीचे एक लाख कोटी रूपयांचे कर्ज माफ केले. हे सरकार शेतकऱ्यांसाठी नव्हे तर अदानी, अंबानीसाठी काम करीत असल्याचा आरोपही विखे पाटलांनी केला. घोषणाचा पाऊस, स्वप्नांची मालिका उभी करायची आणि लोकांची मते मिळवायची हा धंदा केंद्र व राज्यात सुरू आहे. ‘मन की बात’ खूप झाली, आता ‘काम की बात’ करा, हे सांगण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले.
खा. अशोक चव्हाण यांनी भाजपा सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर सडकून टिका केली. शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले तर बँकाचा फायदा होईल, असे सुचक वक्तव्य करणाऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने सावकारांचे भले केले. मुक्तीच्या नावाखाली हे सरकार सामान्य शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत लोटत आहे. उत्तरप्रदेशमध्ये कर्जमाफीचा निर्णय होऊ शकतो, तर महाराष्ट्रात का होऊ शकत नाही, असा सवालही त्यांनी केला. भाजपा सरकारच्या विरोधात कुणीही बोलायचे नाही, आम्ही म्हणतो ते निमुटपणे सहन करा अन्यथा केसेस दाखल करू अशी निजामापेक्षाही हुकूमत गाजवत या सरकारचे काम सुरू आहे. काही झाले तरी आम्ही शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभे असून जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा संघर्ष चालूच राहील, असा इशाराही अशोक चव्हाण यांनी यावेळी दिला.
सेवाग्राम व पवनार आश्रमला भेट
सकाळी संघर्ष यात्रा महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रमात दाखल झाली. बापूकुटीत प्रार्थना करुन आचार्य विनोबा भावे यांच्या पवनार येथील परमधाम आश्रमाला भेट दिली. यानंतर ही संघर्ष यात्रा सेलू येथे दाखल झाली. याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार सुरेश देशमुख, माजी आमदार राजू तिमांडे, अॅड. सुधीर कोठारी, काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, राकॉचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, किशोर माथनकर, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, राजेंद्र शर्मा, इक्राम हुसेन, रामभाऊ सातव यांच्यासहकाँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते होते.