पालिका क्षेत्रातील १४० अंगणवाड्या इमारतीविना
By Admin | Updated: July 4, 2015 00:12 IST2015-07-04T00:12:25+5:302015-07-04T00:12:25+5:30
बालविकास प्रकल्पाच्या माध्यमातून नगर पालिका क्षेत्रातील बालमनावर संस्कार करण्यासाठी अंगणवाड्या चालविल्या जात आहे.

पालिका क्षेत्रातील १४० अंगणवाड्या इमारतीविना
महिन्याकाठी मोजावे लागते १२ लाख ६० हजार रुपये घरभाडे
रूपेश खैरी वर्धा
बालविकास प्रकल्पाच्या माध्यमातून नगर पालिका क्षेत्रातील बालमनावर संस्कार करण्यासाठी अंगणवाड्या चालविल्या जात आहे. जिल्ह्यातील सहा पालिकांमधील तब्बल १४० अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारतीच नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. यामुळे शासनाला या अंगणवाड्या चालविण्याकरिताच महिन्याकाठी तब्बल १२ लाख ६० हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे.
महिला व बालविकास विभागाच्यावतीने बालकांच्या विकासाकरिता एकात्मिक बालविकास प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पांतर्गत नगर परिषदेच्या हद्दीत बालवाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सहा पालिका असून प्रत्येक पालिकेच्या हद्दीत या बालवाड्या कार्यरत आहेत. सहा पालिकेच्या हद्दीत एकूण १५५ अंगणवाड्या कार्यरत आहेत. त्यातील केवळ १५ अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारती आहेत. इतर इमारती भाड्याच्या खोलीत आहेत.
एका अंगणवाडीच्या भाड्यापोटी एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयालला ७५० रुपये येतात. ही रक्कम वर्षातून एकवेळा येत असून ती एकमुस्त घरमालकाच्या नावे देण्यात येत असल्याची माहिती आहे. स्वतंत्र इमारतीकरिता विभागाकडून पालिकेला जागेची मागणी करण्यात येते. ती जागा उपलब्ध असल्यास शासनाकडून निधीची मागणी करून बांधकामाकरिता ती तो निधी पालिकेच्या हवाली करण्यात येत असल्याची माहिती आहे. नव्या सत्रात पालिकेकडे अशी माहिती करण्यात आली नसून गत आर्थिक वर्षात तसा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. प्रकल्पांतर्गत येत असलेल्या अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारती नसल्याने कुठेतरी भाड्यावर मिळणाऱ्या खोलीत या अंगणवाड्या सुरू आहेत. मुलांना खेळण्याकरिता जागा नाही तर कुठे सरळ बसण्याचीही सोय नाही. अंगणवाडी भाड्याच्या खोलीत सुरू असल्याने येथे बालकांना देण्यात येत असलेला पोषण आहार शिजविण्याचीही अडचण जात असल्याची बोंब आहे. अशीच अवस्था या प्रकल्पांतर्गत ग्रामीण भागात असलेल्या अंगणवाड्यांची आहे. कोणाच्या घरी, ग्रामपंचायतीच्या इमारतीत, बुद्धविहारात अंगणवाड्या भरत आहे. याचा विचार करून पालिका प्रशासनाने भाड्याच्या खोलीत भरत असलेल्या अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारतीची मागणी आहे.
वर्धेत ४७ पैकी तीन अंगणवाड्या पालिकेच्या इमारतीत '
एकात्मिक बालविकास प्रल्पांतर्गंत वर्धेत ४७ अंगणवाड्या आहेत. यातील केवळ तीन अंणवाड्या पालिकेच्या मालकीच्या हक्काच्या इमारतीत भरत असल्याने त्यांच्या भाड्याचे पैसे वाचत आहेत. इतर अंगणवाड्या मात्र भाड्याच्या खोलीत भरत आहेत.
हिंगणघाट तालुक्यातील ५४ अंगणवाड्यांपैकी चार अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत आहे तर एक अंगणवाडी शाळेच्या इमारत भरत आहे. त्याच्याकडून भाड्याची रक्कम घेतल्या जात नाही. इतर अंगणवाड्या मात्र भाड्याच्या खोलीत भरत आहेत.
पुलगाव पालिकेच्या हद्दीत या प्रकल्पांतर्गत एकूण २३ अंगणवाड्या आहेत. त्यापैकी एक शासकीय इमारतीत तर एक नगर परिषदेच्या इमारतीत भरत आहे. उर्वरीत अंगणवाड्या मात्र भाड्याच्या खोलीत सुरू आहेत.
आर्वी पालिकेत असलेल्या संपूर्ण २५ अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत आहेत. येथे भाड्यापोटी वर्षाकाटी एकूण २ लाख २५ हजार रुपये जात आहे,
सिंदी (रेल्वे) नगर परिषदेंतर्गत एकूण दोन अंगणवाड्या असून त्यांना स्वतंत्र इमारत आहे.
देवळी पालिकेच्या हद्दीत तीन अंगणवाड्या असून त्या पालिकेच्या इमारतीत भरत आहेत. यामुळे येथे भाड्याचा खर्च येत नाही.