संपाने तरी कर्जमुक्ती होईल का?
By Admin | Updated: June 1, 2017 00:44 IST2017-06-01T00:44:48+5:302017-06-01T00:44:48+5:30
शेतकरी आजपासून संपावर जात आहे. वर्धा जिल्ह्यातही अनेक शेतकऱ्यांनी निर्धार जाहीर केला आहे.

संपाने तरी कर्जमुक्ती होईल का?
संपाने तरी कर्जमुक्ती होईल का?
अभिनय खोपडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शेतकरी आजपासून संपावर जात आहे. वर्धा जिल्ह्यातही अनेक शेतकऱ्यांनी निर्धार जाहीर केला आहे. शेतकरी शेतात पेरणी करणार नाही व शासनाच्या धोरणाचा निषेध करणार आहे. सातबारा कोरा करा म्हणजेच कर्जमुक्ती करा, शेतमालाला हमीभाव द्या या प्रमुख मागण्या आहेत.. केंद्रातील पतंप्रधान नरेंद्र मोदी सरकारने नुकतेच तीन वर्ष पूर्ण केले. राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार लवकरच तीन वर्ष पूर्ण करणार आहे. भाजप विरोधी बाकावर असताना कर्जमाफीची मागणी करीत होता. आता सत्तेवर आल्यानंतर अभ्यास करू म्हणत आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने राज्यातील भाजप वगळता सर्वच पक्ष उभे असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र कर्जमुक्तीचा मामला काही निकाली निघाला नाही. सरकारने जलयुक्त शिवार योजना राबविली. सिंचनाची सोय यातून होणार आहे. तुरीच्या खरेदीला मुदतवाढ दिली. शेवटचा दाणा खरेदी करू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पहिल्याच पावसात मार्केट यार्डात अनेक शेतकऱ्यांच्या तुरी भिजल्या. शेतकऱ्याच्या मुद्दयावर विरोधकांत दम दिसत नाही. अन्यथा संघर्ष यात्रेनंतर शेतकऱ्याची कर्जमुक्ती झाली असती. नोटबंदीनंतर बँकाच्या एटीएममध्ये खणखणाट असल्याने शेतकऱ्याला याचा मोठा फटका बसत आहे. पीक कर्जाचे आपलेच पैसे मिळविण्यासाठी काम सोडून बांधावरचा शेतकरी बँकेच्या रांगेत उभा आहे. तरीही सरकारविषयीचा असंतोष दिसून येत नाहीे.परवा वर्ध्यात सहकार नेत्यांनी ही खंत बोलून दाखविली. विरोधकात दम नाही म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी मुख्यमंत्र्यांनी ‘योग्यवेळी’ देऊ असे सांगून लांबणीवर नेऊन ठेवली आहे. त्यामुळेच आता संपाचे हत्यार शेतकऱ्यांनी उपसले आहे. हे आंदोलन प्रतिनिधीक असले तरी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच शेतकरी संपावर आहे. आजवर वर्धा जिल्ह्याने अनेक शेतकरी आंदोलने पाहिलीत. दिवगंत शेतकरी नेते शरद जोशी साहेबांनी १८ तासापेक्षा अधिक काळ सेवाग्राम रेल्वे स्थानकावर रेल्वे रोखल्या होत्या. सरकार हादरले होते. १९८० च्या दशकात केंद्रीय मंत्र्यांना गावात फिरणे शेतकऱ्यांनी कठीण केले होते. हा या जिल्हयातील शेतकऱ्यांचा दरारा होता. आज शेतकऱ्यांचे अनेक नेते व संघटना झाल्या मात्र न्याय मिळत नाही. असे चित्र आहे. त्यामुळे आता १ जून पासून संपाचे हत्यार शेतकऱ्यांनी उपसले आहे. भाजपला आता शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे लागेल. कर्जमाफी, वीजबिल माफीचे पोकळ आश्वासन देऊन काम भागणार नाही कृती करावी लागेल तेव्हाच शेतकऱ्यांमध्ये विश्वास वाढेल. अन्यथा पुढच्या काळात शेतकऱ्यांचा रोष शासनाप्रती वाढलेला असेल.
वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या अनेक संस्था मोडीत निघाल्या. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुन्हा उभी करुन देऊ असे आश्वासन सरकारने दिले होते. ते हवेतच आहे. एकूणच शेतकऱ्यांची दैनाच त्यांना संपापर्यंत घेऊन येण्यास कारणीभूत ठरली आहे, यांचा विचार शासनकर्त्यांनी करणे गरजेचे आहे.