गुन्ह्यातील शिक्षेची टक्केवारी वाढविणार
By Admin | Updated: May 23, 2015 02:19 IST2015-05-23T02:19:28+5:302015-05-23T02:19:28+5:30
गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचा पूरेपूर प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी प्रकरणांचा सखोल तपास करुन त्या आधारे ...

गुन्ह्यातील शिक्षेची टक्केवारी वाढविणार
वर्धा : गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचा पूरेपूर प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी प्रकरणांचा सखोल तपास करुन त्या आधारे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यास खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा होईलच. शिवाय तपासातील गफलतीमुळे मोकाट सुटणाऱ्यांवरही अंकुश बसणार, परिणामी शिक्षेचे प्रमाण वाढतील, यापुढे गुन्हेगारांची गय केली जाणार नाही, अशी ग्वाही नवे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.
गोयल यांनी गुरुवारी अनिल पारस्कर यांच्याकडून पदाचा प्रभार स्वीकारला. शुक्रवारी त्यांनी आपल्या कक्षात पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ही माहिती दिली. वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर दारूविक्री केली जात आहे. ती नियंत्रणात आणण्याच्या अनुषंगाने कारवाया करण्यावर आगामी काळात भर असेल. पोलीस विभागाने जनतेशी जुळवून घेत कर्तव्य बजावले, तर जनता आणि पोलिसातील दुरावलेला विश्वास पुन्हा कायम करता येईल, असाही आपला प्रयत्न असेल असे ते म्हणाले. राजकीय, सामाजिक पार्श्वभूमीचाही अभ्यास यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. येत्या दिवसांत जिल्ह्यातील ठाण्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन आढावा घेतला जाईल. जिल्ह्यातील शांती व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या अनुषंगाने महत्त्वाची पावले उचलली जाईल, असेही गोयल यावेळी म्हणाले.(जिल्हा प्रतिनिधी)