विष पाजून काढला पत्नीच्या प्रियकराचा काटा
By Admin | Updated: November 13, 2014 23:05 IST2014-11-13T23:05:58+5:302014-11-13T23:05:58+5:30
पत्नीचे अनैतिक संबंध असल्याची बाब लक्षात येताच संतप्त झालेल्या पतीने तिच्या प्रियकराचा विष पाजून काटा काढल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. प्रारंभी या प्रकरणात आकस्मिक

विष पाजून काढला पत्नीच्या प्रियकराचा काटा
पती-पत्नीला अटक : तीन आरोपी फरार
तळेगाव (श्या़पंत़) : पत्नीचे अनैतिक संबंध असल्याची बाब लक्षात येताच संतप्त झालेल्या पतीने तिच्या प्रियकराचा विष पाजून काटा काढल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. प्रारंभी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तपासात सदर प्रकार समोर आल्याने परतोडा येथील पती पत्नीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. मृतकाचे नाव निलेश बाळकृष्ण कुयटे (२२) असे असून त्याला विष देणाऱ्याचे नाव संतोष पचारे असे आहे. यात आणखी तीन आरोपी असून ते फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस सूत्रानुसार, परतोडा येथील एका विवाहितेसोबत निलेशचे अनैतिक संबध होते. याची चर्चा गावात होती़ दीड वर्षापूर्वी मृतक व सदर महिलेला तिच्या पतीने आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. यावेळी बदनामीपोटी महिलेने निलेशविरूद्ध विनयभंगाची तक्रार तळेगाव पोलिसांत दाखल केली होती़ यावरून पोलिसांनी निलेश विरूद्ध ३५४ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती़ तरीही निलेशचे व सदर महिलेचे संबध सुरूच होते. याची माहिती सदर महिलेच्या पतीला मिळाली. यात पत्नीमार्फत १० आॅक्टोबर रोजी निलेशला परतोडा येथील अभिजीत बोके यांच्या शेतात बोलावून त्याला जबरीने विष पाजले. यावेळी त्याच्या सोबत आणखी काही जण होते. निलेशचा मृतदेह शेतात टाकून सर्वजण तिथून निघून गेले़
त्याच दिवशी बोके यांच्या शेतात निलेशचा मृतदेह आढळून आला. शवविच्छेदन अहवालात निलेशने विष घेतल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी प्रारंभी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. दरम्यान मृतकाच्या आईने माझ्या मुलाने आत्महत्या केली नसून विष पाजून त्याची हत्या केल्याचा आरोप करीत पोलिसात तक्रार दाखल केली. शिवाय त्यांनी घटनेच्या दिवशी निलेशला पचारे यांच्या मुलाने घरी येवून बोके यांच्या शेतात बोलावून नेल्याचे सांगितले. मृतकाच्या आईने दिलेल्या बयानावरून पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात पोलिसांनी पचारे दाम्पत्याला ताब्यात घेवून त्यांना विचारणा केली. यात सदर प्रकार समोर आला. यावरून पोलिसांनी आरोपीविरूद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना १७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार झामरे यांच्या मार्गदर्शनात शेख मुसा पठाण, सचिन दवाळे, घनश्याम लांडगे, कापसे करीत आहेत.(वार्ताहर)