लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : 'म्युकर मायकोसिस' म्हणजे काळी बुरशी हे एकप्रकारचे फंगल इन्फेक्शन आहे. यावर वेळीच उपचार न झाल्यास ते जिवावर बेतू शकते. म्युकर मायकोसिसचा हा आजार रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या रुग्णांमध्ये आढळतो; मात्र वेळीच उपचार घेतल्यास म्युकर मायकोसिसचा धोका कमी होत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले आहे. म्युकर मायकोसिस हे एक फंगल इन्फेक्शन असून ते साधारणपणे नाक किंवा सायनसच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करते. रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना हा आजार होण्याची शक्यता असते.
चार टप्प्यांचा आजार; कॅन्सरइतका भयंकरकाळ्या बुरशीचे हे सूक्ष्मजंतू पाने, कंपोस्ट ढीग, माती आणि कुजलेले लाकूड, शिळी भाकरी आणि भाज्यांमध्ये आढळतात. संक्रमित भागातून हवेतील मोल्ड स्पोर्स इनहेल केल्याने म्युकर मायकोसिस होऊ शकतो, परिणामी डोळे, चेहरा, फुफ्फुसे, साइनस, त्वचा, केंद्रीय मज्जासंस्था प्रभावित होऊ शकते. हा आजार कॅन्सर इतका भयंकर आहे.
काय काळजी घ्याल ?रक्तातील साखरेचे प्रमाण वारंवार रक्तातील साखर तपासून नियंत्रणात असल्याची खात्री करावी. माती आणि धुळीच्या थेट संपर्कात येऊ नये. शेत, बगिचा किंवा बांधकामाच्या ठिकाणी संपूर्ण शरीर झाकले जाईल, असे कपडे घालणे. त्वचेवर जखम असेल तर साबण आणि पाण्याने स्वच्छ करावे. वास येणारे, खराब अन्न टाकून द्यावे.
रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना धोकारोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना हा आजार होतो. अशांना हा दुर्मिळ संसर्ग रोखणे महत्त्वाचे आहे, ज्याचा परिणाम मधुमेह, कर्करोग, अवयव किंवा स्टेम सेल प्रत्यारोपण, न्यूट्रोपेनिया, दीर्घकाळ कॉर्टिकोस्टेरॉइड वापरणे, इंजेक्शन ड्रग वापरणे, लोह ओव्हरलोड किंवा शस्त्रक्रियेमुळे त्वचेला दुखापत, भाजणे यासारख्या परिस्थितींमुळे होऊ शकते. रोग प्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींमध्ये हा संसर्ग होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे.
अशी आहेत जीवघेण्या आजाराची लक्षणेनाक बंद पडणे, नाक गळणे, लालसर किंवा काळा स्राव येणे. गालावर सूज येणे, बधीरपणा येणे. तीव्र डोकेदुखी. वरच्या जबड्यातील दात हलणे, जबड्यातील दात पडून पू येणे. वरच्या जबड्याच्या टाळूला किंवा वरच्या भागाला छिद्र पडणे. जबड्याची टाळू व नाकातील त्वचेचा रंग काळसर होणे. नाकाच्या भागाला काळसर ठिपके पडणे. डोळ्याच्या आजूबाजूला, सायनसच्या आजूबाजूचा भाग सुजणे.
"म्युकोर मायकोसिसचा संसर्ग शरीराच्या इतर भागात पसरण्याचा धोका असतो. गंभीर प्रकरणांमध्ये, यामुळे मृत्यू होऊ शकतो. म्हणून, कोणतीही गुंतागुंत टाळण्यासाठी त्वरित उपचार करणे महत्त्वाचे आहे."- डॉ. मेघा कावळे, कान-नाक-घसा तज्ज्ञ