संपूर्ण आकाश ‘कंदिलां’नी गजबजले
By Admin | Updated: October 18, 2014 23:45 IST2014-10-18T23:45:58+5:302014-10-18T23:45:58+5:30
दिवाळी म्हटलं की समोर उभा राहतो दारी अलगद झुलणारा वेगवेगळ्या रंगांचा आकाशदिवा. त्यामुळे आकाश कंदिल बघितला की दिवाळी आली असे लक्षात यायला लागले. त्यामुळे दिवाळीचे वेध लागले की

संपूर्ण आकाश ‘कंदिलां’नी गजबजले
वर्धा : दिवाळी म्हटलं की समोर उभा राहतो दारी अलगद झुलणारा वेगवेगळ्या रंगांचा आकाशदिवा. त्यामुळे आकाश कंदिल बघितला की दिवाळी आली असे लक्षात यायला लागले. त्यामुळे दिवाळीचे वेध लागले की यंदा कसा आकाश दिवा घ्यायचा याचा विचार सुरू होतो. शहरात आकाश दिव्यांनी गर्दी केल्याचे चित्र दिसत असल्याने आकाश ‘कंदिलां’नी सजल्याचे दिसून येत आहे.
आधी एक आकाशदिवा घेतला की तो दोन ते तीन वर्ष वापरण्याचा दंडक होता. निव्वळ आकाश कंदिलासाठी एवढे पैसे कशाला खर्च करायचे असा सर्वसाधारण विचार होत असे. पण आता मात्र चित्र पालटले आहे. दरवर्षी नवा आकाशदिवा घेण्यावर भर दिला जातो. तसेच एकच आकाशदिवा न घेता घरी, गच्चावर, गॅलरीत असे अनेक ठिकाणी आकाशदिवे लावण्यासाठी घेतले जातात.
शहरातही सरळ मुंबईवरून बनलेले आकाशदिवे दिसून येतात. वेगवेगळ्या सुट्या भागात ते आणले जातात आणि येथे जोडले जातात. कधी कधी त्यात रंगसंगतीत जोडताना बदल केले जातात.
खास बनावटीचे असे मोठे आकाशदिवे शहरात मिळत नाही. ३०० ते १५०० रुपयांपर्यंत आकाशदिवे मार्केटमध्ये पहावयास मिळतात. यात पारंपरिक षटकोनी आकाश कंदिलांसोबतच गोल आकाराचे चायनीज, कमळाच्या फुलाचे आकाशदिवे नजरेस पडतात. हे सर्व असताना नवीन काय असा पहिला प्रश्न नागरिकांना पडत असतो.
दरवर्षी वेगळा प्रकार घ्यावा असा सर्वांचा कल असतो.
मोठ्या आकाशदिव्यांसोबतच लहान लहान आकाशदिव्यांनाही विशेष पसंती मिळत आहे. एका दमात दहा ते बारा लहान कंदिल घेऊन ते घरी खूप ठिकाणी लावले जातात. बालकनीत असे आकाशदिवे लावण्याची फॅशन सध्या प्रचलित आहे. पूर्वी घरी आकाशदिवा बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात तावाची मागणी व्हायची. आता तो प्रकार दिसत नाही. तसेच काही वर्षापूर्वी कापडी आकाशदिव्यांची मागणी होती. पण उन्हामुळे कापडाचा रंग उडत असल्याने त्यांना आता विशेष पसंती दिली जात नाही. (शहर प्रतिनिधी)