पेयजल योजनेची विहीर ठरतेय पांढरा हत्ती
By Admin | Updated: May 1, 2017 00:39 IST2017-05-01T00:39:36+5:302017-05-01T00:39:36+5:30
येथे कृत्रिम पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. या गावात अगोदरच दोन नळयोजनेच्या विहिरी,

पेयजल योजनेची विहीर ठरतेय पांढरा हत्ती
नागरिकांना करावी लागते भटकंती : महिलांनी गाजवली ग्रामसभा
तळेगाव(टा.) : येथे कृत्रिम पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. या गावात अगोदरच दोन नळयोजनेच्या विहिरी, दोन जलकुंभ सार्वजनिक विहिरी, खाजगी विहिरी, कुपनलीका आले. तरीही नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात ग्रा.पं. असमर्थ ठरत आहे. पेयजल योजनेच्या विहिरीलाही पाणी राहत नसल्याने ती पांढरा हत्ती ठरत आहे. पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत असल्याने ग्रा.पं.ची ग्रामसभा महिलांनी चांगलीच गाजवली.
तीन वर्षापूर्वी ग्रामपंचायतने १.६६ लाखाची राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना शासनस्तरावर पाठपुरावा करून मंजुर करून घेतली. दोन वर्षे ही योजना श्रेय लाटण्यावरून वादात रखडली. यावर्षी या योजनेचे जंलकुंभ, सात कि.मी. पाईलाईन, विद्युत पुरवठा करण्यात आला. या योजनेचे जलकुंभात पाणीही पोहचले. पण, विहिरीचे अजुनही खोलीकरण पूर्ण व्हायचे असल्याने एक ते दीड तासातच विहीर कोरडी पडते. त्यामुळे ग्रामपंचायत पाणी देण्यास असमर्थ ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून गावकऱ्यांना मुबलक पाणी मिळेल अशी आशा होती. पण, विहिरीतही पाणी नाही. त्यामुळे ग्रा.पं. प्रशासनही हतबल असल्याचे दिसते.
सदर योजनेचे सर्व कामे झाली असले तरी विहिरीचे खोलीकरण अपूर्ण असल्याने जलकुंभ भरत नाही. त्यामुळे या गावातील नागरिकांना घागर घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायत सभागृहात ग्रामसभा पार पडली. यात महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवित सभागृहात पाणी समस्येवर चर्चा केली. सभेमध्ये सरपंच, ग्रा.पं. सदस्य, सचिव उपस्थित होते. महिलांनी केलेल्या पाणी समस्याबाबत प्रश्नाला उत्तरे सरपंच यांनी दिले. त्यांनी पाणी समस्याबाबत माहिती दिली. पण, यावेळी महिला व काही पुरुषांनी सभागृहातच ग्रा.पं. सदस्य व सचिवांना चांगलेच धारेवर धरले. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सोमवार १ मे रोजी ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात आली असून ही ग्रामसभा पाण्याच्या प्रश्नावर चांगलीच गाजणार असल्याचे चित्र आहे. गावाला १४ व्हॉल मधून पाणी पुरवठा केल्या जात असून दहा बारा दिवसाआड नागरिकांना पाणी पुरवठा केल्या जातो. एकूणच योजनेची कामे रखडल्याने ग्रा.पं. प्रशासनाची स्थिती ना घर का ना घाटका अशी झाली आहे.(वार्ताहर)