कुठे कचरा, तर कुठे शेती साहित्य
By Admin | Updated: December 1, 2014 22:57 IST2014-12-01T22:57:51+5:302014-12-01T22:57:51+5:30
पुर्व शालेय शिक्षण व कुपोषणमुक्ती याकरिता मोठा गाजावाजा करून गावागावात अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या. यामागचा शासनाचा उद्देश अंगणवाड्यांचे विदारक वास्तव बघितल्यानंतर साध्य होत आहे का,

कुठे कचरा, तर कुठे शेती साहित्य
अंगणवाड्यांची दैना पाहून सीईओही अवाक्
अरविंद काकडे - आकोली
पुर्व शालेय शिक्षण व कुपोषणमुक्ती याकरिता मोठा गाजावाजा करून गावागावात अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या. यामागचा शासनाचा उद्देश अंगणवाड्यांचे विदारक वास्तव बघितल्यानंतर साध्य होत आहे का, असा प्रश्न पडतो. ग्रामीण भागात अंगणवाडी सुरू होण्याची वेळ सकाळची असली तरी अंगणवाडी सेविका व मदतनिस अंगणवाडीतच येत नसल्याचे वास्तव सेलू तालुक्यात ‘लोकमत’ने सोमवारी केलेल्या ‘स्टींग आॅपरेशन’च्या माध्यमातून पुढे आणले आहे. ही माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ उदय चौधरी यांना सचित्र देताच अंगणवाड्यांची अवस्था व सेविकांचा कामातील गलथानपणा पाहून तेही अवाक् झाले.
अंगणवाडी सुरू होण्याची शासकीय वेळ सकाळी ९.३० वाजताची आहे. याचवेळी आकोली-आंजी मार्गावरील जि.प. शाळेत भरणारी अंगणवाडी व आकोली (हेटी) येथील अंगणवाडीला भेट देण्यात आली. आकोली-आंजी मार्गावरील अंगणवाडीत अंगणवाडी सेविका व मदतनिसाचा पत्ताच नव्हता; मात्र आकोली हेटी येथील अंगणवाडीत अंगणवाडी सेविका पल्लवी कुंडलकर व मदतनीस कविता पाझारे हजर होत्या. येथे मात्र विद्यार्थ्यांचा पत्ता नव्हता.
पुन्हा एका तासाने सकाळी १०.३० वाजता आकोली-आंजी मार्गावरील अंगणवाडीला भेट दिली. तरीही ती कुलुपबंदच होती. नंतर काही वेळाने मदतनीस आली. त्यावेळी सकाळचे १०.४५ वाजले होते. यानंतर अंगणवाडी सेविका रंजना पिंपळे अंगणवाडीत दाखल झाल्या. अर्धा तास अंगणवाडीत कुणी बालक येते का याची वाट पाहण्यात आली; मात्र एकही बालक अंगणवाडीत आला नाही. याच परिसरातील वस्तीत पाहणी केली असता काही उघडी-नागडी पोर गावात हिंडत होती. अंगणवाडी भोवती सर्वत्र गवत व झुडपे वाढलेली आहेत. अंगणवाडीच्या आत एका कोपऱ्यात रेतीचा ढीग व शेतीचे साहित्य ठेवून आहे. तर बाजुलाच बांधकामाकरिता आणलेल्या विटा दिसून आल्या. बालकांना बसण्याकरिता जेमतेम १० बाय १० ची खिडकी नसलेली खोली होती. त्यातच स्वयंपाक करण्याची भांडी, दोन खुर्च्या, उलटे टांगलेले भित्तीपत्रक, मधोमध पडलेला झाडू (फडा) होता. येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना बसण्याकरिता ना चटई होती ना खेळणी, अशी विदारक स्थिती या अंगणवाडीची होती.