दिवाळी साजरी करण्यासाठी पैसा आणायचा कोठून ?
By Admin | Updated: October 18, 2014 23:41 IST2014-10-18T23:41:59+5:302014-10-18T23:41:59+5:30
जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आली. नवे सभापती निवडले गेले. विषय समित्यांचे वाटप बुधवारी करण्यात आले. यामध्ये शिक्षण समिती मिलिंद भेंडे यांना वाट्याला आले. ही सभा होताच त्यांनी

दिवाळी साजरी करण्यासाठी पैसा आणायचा कोठून ?
नव्या शिक्षण सभापतीच्या फतव्याने शिक्षक चिंतेत : गुंडाळलेल्या उपक्रमाची नव्याने सक्ती
वर्धा : जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आली. नवे सभापती निवडले गेले. विषय समित्यांचे वाटप बुधवारी करण्यात आले. यामध्ये शिक्षण समिती मिलिंद भेंडे यांना वाट्याला आले. ही सभा होताच त्यांनी शाळांमध्ये दिवाळी साजरी करण्याचा फतवा काढला. दिवाळी ही आनंद देणारा, घरात सुख शांती आणणारा, जीवन प्रकाशमान करणारा सण आहे. राष्ट्रीय सण म्हणूही साजरा केला जातो. एकाएकी धडकलेल्या या निर्णयामुळे निधी कोठून आणायचा, लोकसहभाग किती लाभेल, असा प्रश्न शाळा व्यवस्थापन समित्यांंना पडला आहे.
भेंडे हे यापूर्वी कॉँग्रेसमध्ये होते. तेव्हा जिल्हा परिषदेवर कॉँग्रेसची सत्ता असताना त्यांना सभापती पदाचा मान मिळाला होता. तेव्हाही त्यांच्याकडे जि.प.चे शिक्षण सभापतीपद होते. त्याहीवेळी त्यांनी शाळांमध्ये दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम पुढे आणला होता. त्यावेळीही हा उपक्रम वादग्रस्त ठरला होता. परिणामी त्यांच्यानंतरच्या सभापतींनी हा उपक्रम कायमचा बासणात काढला होता. आता ते भाजपात असताना सभापती झाले आणि पुन्हा तोच निर्णय शाळांवर लादल्याचा सूर शिक्षकांमध्ये ऐकायला मिळत आहे. कोणतीही योजना कागदावर आली म्हणजे ती राबविली असा अर्थ होत नाही. शाळा व्यवस्थापन समितीची आर्थिक सुबता नाही. ही योजना राबविण्यासाठी निधी कोठून आणायचा, याचा सभापतींनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रात कुठेही उल्लेख नाही. मग हा उपक्रम योजना राबविण्यासाठी लागणारा निधी, शिक्षकांचा समन्वय, संबंधित विभागातील अधिकाऱ्यांचा समन्वय या बाबींचा थातुरमातूर विचार करुन केवळ हा उपक्रम लादण्याचा प्रकार असल्याचा सूर शिक्षकवर्गात उमटत आहे. एकूणच या उपक्रमाबाबत साशंकतेचे वातावरण शाळांमध्ये निर्माण झाल्याने तो कितपत यशस्वी होतो, याबाबत संभ्रम आहे.
शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, शाळांमध्ये पोषण आहाराची रक्कम येते. त्यातून खाद्यपदार्थाचा खर्च करायचा आहे. तसेच समाज सहभागही घ्यायचा आहे. या उपक्रमाला शिक्षण समितीची मंजुरी मिळाली आहे. शाळेतील उपक्रमांना एकत्र करुन एक स्नेहमिलन सोहळा साजरा करायचा आहे. त्याला ‘दिवाळी सर्वांची स्नेहमिलन’ असे नाव दिले आहे.(जिल्हा प्रतिनिधी)