वडगावचे पुनर्वसन कधी होणार

By Admin | Updated: October 22, 2014 23:22 IST2014-10-22T23:22:20+5:302014-10-22T23:22:20+5:30

प्रकल्प निर्मितीला ३४ वर्षाचा काळ लोटला. मात्र अद्याप या धरणाच्या बॅक वॉटरचा फटका वडगाववासीयांना सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात धरणाचे पाणी ग्रामस्थांच्या घरात शिरुन मोठे

When will the rehabilitation of Wadgaon ever be? | वडगावचे पुनर्वसन कधी होणार

वडगावचे पुनर्वसन कधी होणार

गिरड : प्रकल्प निर्मितीला ३४ वर्षाचा काळ लोटला. मात्र अद्याप या धरणाच्या बॅक वॉटरचा फटका वडगाववासीयांना सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात धरणाचे पाणी ग्रामस्थांच्या घरात शिरुन मोठे नुकसान होते. त्यांच्यासमोर जगण्याचा प्रश्न उभा ठाकतो. मात्र पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबितच आहे. त्यामुळे पुनर्वसन कधी होणार, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
१९८० मध्ये पोथरा प्रकल्पाची निर्मिती झाली. या धरणाकरिता शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली. पावसाळ्यात धरणाचे पाणी शिरुन गावाचा संपर्क तुटतो. गावाबाहेर जाणारे सर्व मार्ग बंद होतात. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे गावात पाणी शिरले. कित्येक दिवस गावकरी यातना सहन करीत होते. गावाचे पुनर्वसन करण्याकरिता गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन), उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांना निवेदन दिले. परंतु याकडे कानाडोळा केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी उपजिल्हाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, वर्धा यांना पत्र देऊन पुनर्वसन करण्याबाबतचा अहवाल सादर करण्यास कळविले. त्यानंतर त्याबाबत पाहणीसुद्धा झाली. पोथरा धरणाची पूर्ण पातळी २२९९.४०० मीटर तर महत्तम जलपातळी २३१.२३० मीटर व धरणमाथा पातळी २.३३.०३० मीटर आहे. तेव्हा धरणमाथा पातळी २३३.०३० तलंकापर्यंत येत असल्यामुळे वडगाव गावात बॅक वॉटर पूर्णपणे होते, असा निष्कर्ष काढण्यात आला. गावात येणारे संपूर्ण मार्ग बंद झाल्याने गावाचा संपर्क तुटतो. त्यामुळे गावाचे पुनर्वसन करावे, असे शासनालासुद्धा कळविण्यात आले होते. अहवाल पाठविताना पोथरा प्रकल्प हा गावापासून ५०० मीटर अंतरावर असून लोकसंख्या ५६१ असून १३६ कुटुंबसंख्या आहे. पुनर्वसनाकरिता १२.६५ आर.क्षेत्राची गरज असल्याचेही नोंदविण्यात आले. ग्रा.प.द्वारे ठराव घेऊन पुनर्वसनासाठी आवश्यक शेतजमिनीचे सर्व्हे क्रमांक कळविण्यात आले. अनेक शेतकरी पुनर्वसनाकरिता शेतजमीन देण्यास तयार असल्याचे सुद्धा कळविण्यात आले. मात्र अद्याप शासनाकडून दखल घेण्यात आली नाही. पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)

Web Title: When will the rehabilitation of Wadgaon ever be?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.