दहेगाव (गो) पोलिसांना निवारा कधी मिळणार?
By Admin | Updated: October 14, 2015 02:14 IST2015-10-14T02:14:50+5:302015-10-14T02:14:50+5:30
येथे २००२ मध्ये पोलीस स्टेशनची निर्मिती झाली. परंतु तेरा वर्षे लोटूनही पोलिसांना निवासासाठी वसाहती बांधण्यात आलेल्या नाही.

दहेगाव (गो) पोलिसांना निवारा कधी मिळणार?
१३ वर्षांपासून प्रतीक्षा : अनेक वर्षांपासून मागणी प्रलंबित
दहेगाव (गोसावी) : येथे २००२ मध्ये पोलीस स्टेशनची निर्मिती झाली. परंतु तेरा वर्षे लोटूनही पोलिसांना निवासासाठी वसाहती बांधण्यात आलेल्या नाही. त्यामुळे येथील पोलिसांना निवारा कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
२००२ पूर्वी दहेगाव हे सिंदी (रेल्वे) पोलीस स्टेशन अंतर्गत येत होते. या गावात मोठ्या प्रमाणात वादंग होत असल्याने सदर गाव शासनाच्या काळ्या यादीत होते. त्यामुळे येथे पोलीस स्टेशन होवून शांतता व सुव्यवस्था राहावी, यासाठी तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांच्या मार्गदर्शनात व तत्कालीन जि.प. उपाध्यक्ष तथा विद्यमान जि. प. सदस्य अरुण उरकांदे यांच्या सहकार्याने येथे पोलीस स्टेशनची निर्मिती झाली. सेलू तालुक्यातील हे तिसरे पोलीस स्टेशन आहे. सदर पोलीस स्टेशन हे स्मशानभूमी परिसरात असल्यामुळे निवासस्थानाअभावी जळत्या प्रेताकडे बघत पोलिसांना दिवस काढावे लागतात.
येथे केवळ ठाणेदारांसाठी निवासस्थान बांधण्यात आले. उर्वरित पोलिसांसाठी निवासस्थान नसल्यामुळे त्यांना ४० ते ५० किमी अंतरावरून ये-जा करावी लागते.
पोलिसांची ड्युटी चोवीस तास असते. वेळेवर पोहचण्यासाठी धावपाळ करीत वाहनाने पोहचताना अपघाताची शक्यता असते. येथे पोलिसांसाठी वसाहत बांधण्यासंदर्भात बांधकाम विभागाकडे सुचित केल्याचे सांगितले जाते. परंतु अद्याप वसाहतीचा पत्ता नाही.
पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांनी या समस्येकडे लक्ष देत पोलिसांच्या निवासासाठी विशेष प्रयत्न करावे, अशी मागणी केली जात आहे.(वार्ताहर)