अन् ओसाड भिंती झाल्या बोलक्या

By Admin | Updated: February 25, 2017 00:38 IST2017-02-25T00:38:46+5:302017-02-25T00:38:46+5:30

पानाच्या लाल पिचकाऱ्या आणि जाहिरातीच्या फलकाने झाकोळलेल्या शहरातील भिंती आता बोलू लागल्या आहेत.

When the walls are empty | अन् ओसाड भिंती झाल्या बोलक्या

अन् ओसाड भिंती झाल्या बोलक्या

आलेखन उपक्रम : जिल्हा व पालिका प्रशासन आणि बा.दे. अभियांत्रिकी विद्यालयाची कल्पना
वर्धा : पानाच्या लाल पिचकाऱ्या आणि जाहिरातीच्या फलकाने झाकोळलेल्या शहरातील भिंती आता बोलू लागल्या आहेत. काही प्रमुख मार्गावरील भिंती काहीतरी संदेश देत आहे. कुठे पाण्याची बचत करा तर कुठे झाडे जगवा, मुली वाचवा असा मजकूर नजरेस पडतो. ही किमया कलाकाराने नाही तर वर्धेतील सामाजिक जाण असलेल्या काही युवकांनी चिमुकल्यांच्या सहकार्याने साधली आहे.
स्वच्छ शहराकरिता पालिकेच्यावतीने अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरात स्वच्छता अभियान राबविताना येथील काही मोठ्या भिंतीवर नागरिक पिचकाऱ्या उडवित असल्याचे दिसून आले. हा प्रकार टाळण्याकरिता जिल्हा व नगर परिषद प्रशासनाच्या सहकार्याने बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने राबविलेल्या या उपक्रमातून वर्धेतील अनेक भिंती बोलक्या झाल्या. यामुळे आता अशा भिंतीवर पानाच्या पिचकाऱ्या उडवून या चिमुकल्यांच्या भावनांचा अनादर टाळण्याची जबाबदारी वर्धेकरांची आहे. नेहमी बदल स्वीकारणारे वर्धेकर याला साथ देतील अशी अपेक्षा आयोजकांकडून करण्यात येत आहे.
चित्र काढताना कोणता एक विषय देण्यात आला नव्हता. अट होती ती एवढीच की काढलेले चित्र सामाजिक समस्या मांडणारे असावे. यातूनच काही चिमुकल्यांनी आपल्या कल्पनाशक्तीने अनेक समस्या चित्रित केल्या. यात एक नाही तर अनेक समस्या मांडण्यात आल्या. पर्यावरण रक्षणासह बेटी बचाव, आरोग्याचा मंत्र अशा एक ना अनेक चित्रांनी वर्धेतील भिंती बोलक्या झाल्या. या स्पर्धेचे संयोजन डॉ. संजय मकरंदे यांनी केले. (प्रतिनिधी)

९० चमूच्या माध्यमातून २९० विद्यार्थ्यांचा सहभाग
शहराची सुंदरता आणि चिमुकल्यांसह युवकांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देत आयोजित केलेल्या या स्पर्धेत शहरातील तब्बल ९० चमुंनी सहभाग घेतला. या ९० चमूच्या माध्यमातून एकूण २९० कलाकारांनी या भिंती कुंचल्यातून बोलक्या केल्या.
आता या मार्गावर बोलतात भिंती
स्वच्छ शहराच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या स्पर्धेतून रेल्वेस्थानक मार्ग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि व्हीआयपी मार्गावर ओसाड असलेल्या सार्वजनिक भिंती बोलक्या केल्या आहेत. भिंतींचा प्रत्येक भाग काही ना काही सांगत आहे. यातून शहरातील नागरिकांनी बोध घ्यावा, असा संदेश चिमुकल्यांच्या कुंचल्यातून साकारलेले चित्र देत आहेत.

Web Title: When the walls are empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.