आगीत गहू पीक खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 22:10 IST2019-04-08T22:10:11+5:302019-04-08T22:10:41+5:30
अचानक लागलेल्या आगीत शेतातील गहू पीक जळून खाक झाले. ही घटना गोंदापूर शिवारात घडली असून यामुळे शेतकरी विलास टेंभरे यांचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद सेवाग्राम पोलिसांनी घेतली आहे.

आगीत गहू पीक खाक
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अचानक लागलेल्या आगीत शेतातील गहू पीक जळून खाक झाले. ही घटना गोंदापूर शिवारात घडली असून यामुळे शेतकरी विलास टेंभरे यांचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद सेवाग्राम पोलिसांनी घेतली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मौजा मदणी (दिंदोडा) येथील शेतकरी विलास टेंभरे याचे गोंदापूर शिवारात शेत आहे. त्यांनी यंदा रबी हंगामात गव्हाची लागवड केली होती. वेळोवेळी योग्य निगा घेतल्याने पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. केवळ कापणी करून मळणी करणे शिल्लक असताना शेतात अचानक आग लागली. या आगीत शेतातील संपूर्ण गहू पीक जळून कोळसा झाले. यामुळे शेतकरी टेंभरे यांचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. तक्रारीवरून या घटनेची सेवाग्राम पोलिसांनी घेतली आहे. पुर्वीच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत असून त्याच अशा पद्धतीने आर्थिक नुकसान झाल्याने सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांला शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे.
जंगलाला लागलेल्या आगीवर नियंत्रण
विरूळ (आकाजी.) : मौजा परसोडी, एकबुर्जी व पाचोड जंगल शिवारात लागलेली आग झपाट्याने गावाच्या दिशेने सरकत होती. सदर घटनेची माहिती मिळताच दारूगोळा भांडाराच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून आगीवर पाण्याचा मारा करून वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.जंगल शिवारात आग लागल्याचे लक्षात येताच वनरक्षक सोनटक्के यांनी परसोडी येथील पोलीस पाटील नयन लांडगे, टेंभरीचे पोलीस पाटील सतीश खंडारे यांना माहिती देत पोलिसांना माहिती दिली. शिवाय आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, वाढते तापमान आणि वारा असल्याने त्यांच्या प्रयत्नांना पाहिजे तसे यश मिळाले नाही. बघता-बघता ही आग एकगुर्जी गावाच्या दिशेने सरकली. दरम्यान, वनविभागाच्या रोहना बीटप्रमुखांना तसेच कोतवाल कासार यांना आणि आर्वीच्या तहसीलदारांना माहिती देण्यात आली. त्यांची लगेच ही माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर जिल्हाधिकाºयांची सूचना मिळताच पुलगाव न.प.प्रशासन व पुलगावच्या दारूगोळा भांडाराच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठून परिसरातील नागरिकांच्या मदतीने आगीवर पाण्याचा मारा केला. काही तासांच्या प्रयत्नाअंती सदर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.