गहू भुईसपाट; संत्रा व केळीचे नुकसान
By Admin | Updated: February 28, 2016 02:09 IST2016-02-28T02:09:57+5:302016-02-28T02:09:57+5:30
जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून नेला. झालेल्या नुकसानीची पाहणी सुरू असतानाच शनिवारी सायंकाळीही पुन्हा काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

गहू भुईसपाट; संत्रा व केळीचे नुकसान
वादळी पावसाचा फटका : वर्धेसह, सेलू व कारंजा तालुक्यात गारपीट
वर्धा : जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून नेला. झालेल्या नुकसानीची पाहणी सुरू असतानाच शनिवारी सायंकाळीही पुन्हा काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. वर्धेसह सेलू व कारंजा (घाडगे) तालुक्यातील काही भागात तुरळक गारा पडल्या. शनिवारी सायंकाळीही जिल्ह्यावर पावसाचे सावट कायम असल्याचे चित्र होते.
या पावसासह झालेली गारपीट व वादळामुळे शेतात सवंगणीला आलेला गहू भुईसपाट झाला तर शेतात ठेवलेल्या चन्याच्या गंज्या ओल्या झाल्या. शनिवारी सायंकाळी आलेल्या गारपीटीमुळे सेलू तालुक्यातील केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले. यावेळी आलेल्या गारांमुळे केळीचे घड कोसळले. काही घरांवर छत उडाले. कारंजात झालेल्या गारपीटीमुळे संत्रा बागांचे नुकसान झाले. आकोली, आंजी भागातही गारपीट झाले.
शुक्रवारी दिवसभर तापलेल्या उन्हानंतर रात्री अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे झालेल्या नुकसानीची सकाळी पाहणी करण्यात आली असता बऱ्याच शेतात गव्हाचे उभे पीक भुईसपाट झाल्याचे दिसून आले. शुक्रवारच्या पावसाने सर्वाधिक नुकसान वर्धा तालुक्यात झाल्याचे निदर्शनास आले. या पावसामुळे वायगाव (निपाणी) परिसरात गहू व कापूसही ओला झाला. आंजीतही गहू चन्याचे नुकसान झाले. खरीपात पावसाच्या अनियमिततेमुळे पीक हातचे गेले. यामुळे रबीत उत्पादन घेवून झालेले नुकसान भरण्याची शेतकऱ्यांची इच्छा असताना या वादळी पावसामुळे दृष्टचक्र सुरूच असल्याचे दिसले. यामुळे नुकसानीचा सर्व्हे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होत आहे.