अहो आश्चर्यम्! पक्क्या सिमेंट रस्त्यावर पुन्हा सिमेंट रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 05:00 AM2020-07-20T05:00:00+5:302020-07-20T05:00:02+5:30

शहरातील बऱ्याच भागात अद्यापही पक्के रस्ते नाहीत. अमृत योजनेअंतर्गत रस्त्याचे खोदकाम केल्याने रस्ते खडबडीत झाले आहे. मात्र, दुरुस्ती करण्यात चालढकल केली जात आहे. अशातच रविवारी शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील मालगुजारीपुरा येथील जयस्वाल ते धाबलिया यांच्या घरापर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. वास्तविक, हा रस्ता आधीच सिमेंटचा असून मजबूत आहे.

What a surprise! Cement road again on paved cement road | अहो आश्चर्यम्! पक्क्या सिमेंट रस्त्यावर पुन्हा सिमेंट रस्ता

अहो आश्चर्यम्! पक्क्या सिमेंट रस्त्यावर पुन्हा सिमेंट रस्ता

Next
ठळक मुद्देलाखोंच्या निधीचा चुराडा : नगरपालिकेच्या विकासकामांवर पिकला हशा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे अगोदरच वर्धेकर वैतागले आहेत. काही दिवसांपूर्वी एका नगरसेवकाने मजबूत सिमेंट रस्त्यावर डांबरीकरण करून पालिकेच्या निधीचा चुराडा केला. तर आता सिमेंटच्या पक्क्या रस्त्यावर पुन्हा नव्याने सिमेंटचा रस्ता बांधून लाखो रुपयांच्या निधीचा अपव्यय चालविल्याचा आरोप खुद्द प्रभागातील नागरिकांकडून केला जात आहे. मागणी आणि आवश्यकता नसतानाही विकासाच्या नावावर चालविलेल्या निधीच्या या उधळपट्टीमुळे पालिकेच्या कामांचाही हशा होत आहे.
शहरातील बऱ्याच भागात अद्यापही पक्के रस्ते नाहीत. अमृत योजनेअंतर्गत रस्त्याचे खोदकाम केल्याने रस्ते खडबडीत झाले आहे. मात्र, दुरुस्ती करण्यात चालढकल केली जात आहे. अशातच रविवारी शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील मालगुजारीपुरा येथील जयस्वाल ते धाबलिया यांच्या घरापर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. वास्तविक, हा रस्ता आधीच सिमेंटचा असून मजबूत आहे. त्यामुळे रस्त्याचीही मागणी केली नसल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. असे असतानाही या सिमेंट रस्त्यावर पुन्हा सिमेंटचा रस्ता बांधला जात असल्याने या परिसरात राहणाºया नागरिकांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. या रस्ता बांधकामाची सकाळपासून चर्चा रंगली होती. आवश्यकता नसतानाही रस्त्याचे बांधकाम करून लाखोंच्या निधीचा चुराडा होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी लोकमतशी बोलताना दिली. हे नागरिकांना कळले पण, नगरपालिका प्रशासन, लोकप्रतिनिधींना कसे काय कळले नसावे, हा संशोधनाचा विषय आहे.

उंची वाढल्याने घरात शिरणार पाणी
या रस्त्यालगत एका बाजूने नाली असून त्या नालीचे सहा महिन्यांपूर्वी बांधकाम करण्यात आले आहे. आता सिमेंटच्या पक्क्या मूळ रस्त्यापासून जवळपास फूटभर नवीन रस्त्याची उंची वाढविण्यात आली आहे. त्यामुळे हा रस्ता वाढल्याने पावसाचे पाणी लगतच्या घरामध्ये शिरण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच नुकतीच बांधलेली नाली आता वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. नगरपालिकेकडून शहरात नियोजनशून्य काम सुरू असल्याच्या बाबीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

बांधकामाकरिता एनओसी मिळाली कशी?
प्रभाग क्रमांक ११ मध्ये सुरु असलेल्या या सिमेंट रस्त्याच्या बांधकामाबाबत सकाळपासून चर्चा सुरू झाली. अगोदरच पक्का रस्ता असताना त्यावर दुसरा दुसऱ्या रस्त्याला मंजुरी दिली जात नाही. विशेषत: कोविड-१९ च्या महामारीमध्ये शासनाकडे निधीची कमतरता आहे. त्यामुळे शासनाने बराचसा निधी परत मागितला आहे. असे असतानाही आवश्यकता नसताना लाखो रुपये खर्चून सिमेंट रस्त्यांचे बांधकाम करणे, अयोग्य असून या रस्त्याच्या बांधकामाला पालिकेनेही मंजुरी दिली कशी? याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे.
आता नुकताच या रस्त्याच्या बांधकामासंदर्भात माहिती प्राप्त झाली आहे. मजबूत रस्ता असतांना त्यावर नव्याने बांधकाम करण्याचा प्रश्नच येत आहे. तो कोणता रस्ता आहे, कोणत्या फंडातून बांधल्या जात आहे याची माहिती घेतली जाईल.
- अतुल तराळे, नगराध्यक्ष, वर्धा.

Web Title: What a surprise! Cement road again on paved cement road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.