रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरी धोकादायक
By Admin | Updated: May 22, 2014 01:22 IST2014-05-22T01:22:23+5:302014-05-22T01:22:23+5:30
आष्टी-परसोडी ते खडकी या ग्रामीण मार्गावर दोन विहिरी ऐन डांबरी रस्त्याला लागून आहे.

रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरी धोकादायक
आष्टी (श.) : आष्टी-परसोडी ते खडकी या ग्रामीण मार्गावर दोन विहिरी ऐन डांबरी रस्त्याला लागून आहे. वाहतुकीचा रस्ता असल्याने या ठिकाणी अनेक अपघात झालेत. सदर दोन्ही विहिरी गत अनेक वर्षापासून तशाच पडून आहेत. या विहिरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत असल्याने बांधकाम विभागाने दोन्ही विहिरी त्वरित बुजवाव्यात, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. येथील शेतकरी धनराज गुल्हाणे यांची आष्टी-परसोडा रस्त्यावर शेती आहे. शेताच्या एका बाजूचा धुरा रस्त्याच्या दिशेने आहे. याच ठिकाणी दोन विहिरी एकमेकांना लागून आहेत. या विहिरी बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या हद्दीत आहेत. विहिरीची लांबी ७0 फूट खोल तर रूंदी १२ फूट असून दुसरी विहीर १00 फूट खोल तर रूंदी १८ फुटाची आहे. दोन्ही विहिरीत पाणी असल्याने अपघात झाल्यावर अनेक जीव जातात. सद्यस्थितीत विहिरीच्या सभोवताल काटेरी संरक्षण ठेवण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी कुणालाही दिसत नसल्याने हमखास अपघात होतो. दोन्ही विहिरी बुजवून पावसाळ्यातील पाणी वाहून जाण्यासाठी नाल्यांची आवश्यकता आहे. सदर विहिरी सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप बुजविण्यात आल्या नाहीत. यामुळे प्रवाशांच्या जीविताचा बांधकाम विभागाने खेळ चालविल्याचा आरोप शेतकर्यांनी निवेदनातून केला आहे. याच रस्त्यावर आष्टीजवळ लेंडी नदीवर पूल आहे. पुलाजवळील नदीचे पात्र बुजल्याने पाणी पुलावरून वाहते. पावसाळ्यात प्रवासी, शेतात ये-जा करणारे शेतकरी, मजूर यांच्याकरिता पुलावरून वाहणारे पाणी डोकेदुखी ठरते. सदर पुलाच्या भोवताल साचलेले ढिगारे काढून नदीचे पात्र खोल करण्याची मागणी करण्यात आली आहे; पण याकडेही कुणी लक्ष देण्यास तयार नाही. रस्ता व इमारती बांधकामावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात; पण आवश्यक कामे केली जात नाहीत. संबंधितांनी लक्ष देत दोन्ही विहिरी त्वरित बुजविण्यात याव्यात, अशी मागणीही शेतकर्यांनी केली आहे.(प्रतिनिधी)