असंघटित कामगारांनाही कल्याण केंद्राच्या सवलती
By Admin | Updated: October 10, 2015 02:41 IST2015-10-10T02:41:04+5:302015-10-10T02:41:04+5:30
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळांतर्गत राज्यातील कापड उद्योग, विद्युत, परिवहन, आणि बँकांमध्ये कार्यरत कामगार कर्मचाऱ्यांसाठी

असंघटित कामगारांनाही कल्याण केंद्राच्या सवलती
पुलगाव येथे नवीन कामगार कल्याण केंद्राचे उद्घाटन
पुलगाव : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळांतर्गत राज्यातील कापड उद्योग, विद्युत, परिवहन, आणि बँकांमध्ये कार्यरत कामगार कर्मचाऱ्यांसाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तक वितरण, शिशुमंदिर, शिवणवर्ग अशा योजना राबवित आहे. याला जोड देऊन आता संगणक प्रशिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन विदेशी भाषा शिक्षण आदी नवे उपक्रमही राबविले जात आहे. या कल्याणयोजनांचा लाभ हॉटेल, बार , दुकान आदी ठिकाणी करीत असलेल्या असंघटित कामगारांनाही मिळणार असल्याचे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे सदस्य प्रमोद मोहोड यांनी सांगितले.
कापड गिरणी कामगारांना कल्याण योजनेच्या सवलती प्रदान करणारे शहरातील कामगार कल्याण केंद्र २००३ पासून बंद झाले होते. तब्बल १२ वर्षांच्या प्रयत्नानंतर नव्याने सदर केंद्र कार्यरत झाले. या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मनीषकुमार साहू तर अतिथी म्हणून मंडळाचे सदस्य रमेश सावरकर उपस्थित होते. जयभारत टेक्सटाईल्सचे महाव्यवस्थापक विजयकुमार लढ्ढा सहायक कल्याण आयुक्त सतीश दाभाडे, परिवहन मंडळाचे डेपो मॅनेजर बालाजी भांगे, बी.ई.सी. फर्टीलायझर्सचे अमित डोंगरे, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे रामेश्वर वाघ, गुणवंत कामगार पुरस्कृत अरविंद बाभळे, धनराज पटले आदी उपस्थित होते. कामगारांसाठी मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी सत्यजीत चौधरी यांनी केले. संचालन व आभार सुषमा बाराहाते यांनी केले. पंचधारा रोडवर असलेल्या या केंद्रासाठी नगरपालिकेने जागा दिल्यास स्वत:च्या इमारतीच्या प्रस्ताव नियोजित असल्याचे कल्याण आयुक्त दाभाडे यांनी याप्रसंगी सांगितले.(तालुका प्रतिनिधी)