पोटाच्या खळगीसाठी थरथरत्या हातांवरही भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2015 02:05 IST2015-11-26T02:05:13+5:302015-11-26T02:05:13+5:30
घरात बसून आराम करणे, नातवंडांना सांभाळणे, कुटुंबातील सदस्यांनी प्रेमाने दोन घास द्यायचे, ही अपेक्षा वृद्धापकाळात असणे स्वाभाविक आहे;...

पोटाच्या खळगीसाठी थरथरत्या हातांवरही भार
जगण्याची धडपड : सत्तरी ओलांडल्यानंतरही करावे लागतेय कापूस वेचणीचे काम
प्रफूल्ल लुंगे सेलू
घरात बसून आराम करणे, नातवंडांना सांभाळणे, कुटुंबातील सदस्यांनी प्रेमाने दोन घास द्यायचे, ही अपेक्षा वृद्धापकाळात असणे स्वाभाविक आहे; पण काठीचा आधार घेत थरथरत्या शरीराचा तोल सांभाळत कापूस वेचून पोटाची खळगी भणाऱ्या वृद्ध महिला पाहिल्या की, कुणालाही वेदना होतीलच! सध्या हे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.
७० ते ७५ वर्षे वयाच्या या वृद्ध महिलांना आरामाची गरज आहे; पण त्यांना स्वत:च्या पोटाची टिचभर खळगी भरण्यासाठी संघर्षच करावा लागत आहे. ही बाब धडधाकट कामचुकार माणसांच्या डोळ्यात अंजण घालणारीच आहे. सध्या दररोज ग्रामीण भागातील महिला शेतात कापूस वेचणीला जातात. त्या महिलांसोबत काही वृद्ध महिला बरेच अंतर मागे राहत त्यांच्यासोबत शेतात कापूस वेचणीला जातात. सकाळी ९ ते १० वाजता घरून निघाल्यावर सूर्य अस्ताला गेल्यावर कापसाचे ओझे आणणे शक्य नसल्याने शेत मालकास वाहनात कापूस आणण्याची विनंती करतात.
रेहकी येथील उषा लाखे यांना लकवा मारला आहे. शासनाकडून श्रावणबाळ योजनेचे मानधनही मिळत नाही. पतीचे निधन झाले. घरी सव्वा एकर शेतीचा तुकडा तीन मुले वेगवेगळी राहतात. मुलीचे लग्न झाले. उषा स्वत: वेगळ्या घरात एकाकीपणाचे जीवन जगत आहे; पण जगण्यासाठी त्यांना कष्ट करावे लागत आहेत. सध्या त्या दिवसभरात ३० ते ४० किलो कापूस वेचतात. अशा अनेक उषा आज मुले असताना निराधाराचे जीवन जगत संघर्ष करीत आहे. ग्रामीण भागात कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसताना वृद्ध महिला हातात काठी घेऊन कापूस वेचायला जाताना दिसतात. जीवनभर आपल्या घरासाठी झिजलेल्या महिलांना किमान वृद्धापकाळा तरी घरी बसून दोन वेळचे जेवण मिळावे, ही अपेक्षा असते; पण वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरही तालुक्यातील काही वृद्ध महिलांना जगण्यासाठी धडपड करावी लागत असल्याचे चित्र आहे.