सर्वांनी कुटुंबीयासह धरली वाट
By Admin | Updated: June 1, 2016 02:37 IST2016-06-01T02:37:26+5:302016-06-01T02:37:26+5:30
बॉम्बचा धमाका, लागलेली आग यामुळे आगरगाव, पिपरी, नागझरी, मुरदगाव, येसगाव, पारधी बेडा व परिसरातील गावात एकच कल्लोळ माजला होता.

सर्वांनी कुटुंबीयासह धरली वाट
अनेकांनी मांडल्या व्यथा : जीव राहिला तर जग पाहू!
देवळी : बॉम्बचा धमाका, लागलेली आग यामुळे आगरगाव, पिपरी, नागझरी, मुरदगाव, येसगाव, पारधी बेडा व परिसरातील गावात एकच कल्लोळ माजला होता. जो तो भीतीग्रस्त होता. धमाक्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने त्यांची स्थिती दयनीय ठरली होती. असा जीवघेणा धमाका याआधी कधीही अनुभवला नसल्याचे ते सांगत होते. ‘जीव राहीला तर जग पाहू ’ अश्या समजेतेतून त्यांनी घर सोडले होते.
काहींनी आपले कुटुंब मोटार सायकलवर घेवून नातेवाईकांचे घरे गाठले तर बहुतांश लोकांनी आपले मुलाबाळसहित पायदळ वाट धरली होती. लोकप्रतिनिधींकडून वाहनांची व्यवस्था होतपर्यंत देवळी व नाचणगावकडे जाणारे सर्व रस्ते या लोकांमुळे कच्च भरले होते. सर्वांच्या चेहऱ्यांवर मृत्यूची छाया दिसत होती.
आपल्याच गावात आपण पोरके झालो. पुलगाव दारुगोळा परिसरात राहणाऱ्या लोकांचे भविष्य अंधातरी ठरले आहे. आपल्याच गावात आपण पोरके झाल्याच्या भावनेने त्यांच्या मनात घर केले आहे.
घटनेच्या दिवशी रात्रपाळीवर असलेले, याच गावातील पाकरे व येसनकर यांचा अद्याप पर्यंत पत्ता न लागल्याने त्यांच्या कुटुंबीयांचा काळजाचा ठोका चुकला आहे.(प्रतिनिधी)
गावाच्या पुनर्वसनाकरिता ठोस कार्यक्रमाची मागणी
या गावाच्या पुर्नवसनाबाबत शासनाजवळ ठोस कार्यक्रम नसल्याने सर्वच अडचणीत आले आहे. या भागातील कास्तकारांना वडिलोपार्जित शेती करणेही कठीण झाले आहे. शेतकऱ्याने आपल्या शेतातील कचरा पेटविण्यासाठी थोडा ज्वाळ केला तर त्याला दारुगोळा सैनिकांकडून मारहाण केली जाते. विहिरीचे बांधकाम, घराच्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम तसेच इतर विकासाची कामे करण्यास मनाई असल्याने या गावातील लोकांना अस्थीरतेची भीती घर करुन आहे.