कल्पवृक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर
By Admin | Updated: March 19, 2017 01:12 IST2017-03-19T01:12:41+5:302017-03-19T01:12:41+5:30
शीतल छाया, पक्ष्यांचे आश्रय स्थान, पर्यावरण आणि आरोग्याचे रक्षण करणारे झाड म्हणजे कडूनिंब होय;

कल्पवृक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर
जपणूक गरजेची : देशी झाडांवर कुऱ्हाड तर विदेशी वृक्षांचे जतन
सेवाग्राम : शीतल छाया, पक्ष्यांचे आश्रय स्थान, पर्यावरण आणि आरोग्याचे रक्षण करणारे झाड म्हणजे कडूनिंब होय; पण मानवाच्या लालसेमुळे या झाडांवर संकट आले आहे. कल्पवृक्ष म्हणून ओळख असणारी ही झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे.
पूर्वी रस्त्याच्या दुतर्फा, शेत व बांधाच्या काठावर तथा मोकळ्या रानात मोठ्या प्रमाणात कडूनिंबाची झाडे आढळत होती. मानवाला वृक्षाचे महत्त्व आणि कडुनिंबाचे गुणधर्म कळायला लागले. याच वैशिष्ट्यामुळे कडूनिंबाने आयुर्वेदात स्थापन प्राप्त केले. या झाडाच्या पान, फांद्या, साल, खोड एवढेच नव्हे तर झाडाच्या खालची मातीही विविध आजारासाठी उपयोगी पडते. पिवळ्या रंगाची फळे पक्ष्यांसाठी तर बिया, तेल खतांसाठी उपयोगात आणले जाऊ लागले. पर्यावरणात शुद्धता ठेवण्याचे या झाडाचे महत्त्वाचे योगदान असते. विविध कारणासाठी उपयोगी असणारे झाड वाटसरू प्राण्यांसाठी विश्रामांचे स्थान बनले होते. झाडाचे महत्त्व व ऋषीमुनी, संत एवढेच नव्हे तर छत्रपती शिवरायांनीही आपल्या आज्ञापत्रात याचा उल्लेख केलेला आहे.
झाडातील आरोग्य वर्धक व उपचारामुळे मानवाने फांद्या, पाने व साल काढायला सुरुवात केली. यामुळे झाडे वाळू लागली. झाडांची साल संरक्षण व अन्न रस पुरवठा करणारी असते. साल काढल्याने पुरवठा थांबतो व झाड वाळते. मानवाच्या अशा कृत्यांमुळेच सेवाग्राम, वर्धा, नागपूर तसेच सेवाग्राम, हमदापूर या मार्गावरील झाडांचे प्रमाण कमी झाले.
देशी झाडांवर कुऱ्हाड चालविली आणि विदेशी झाडांचे संवर्धन होताना दिसते. यातूनच कडुनिंबाची कत्तल होत असून झाडे कमी होत आहे. याकडे लक्ष देत कडुनिंबाचे संवर्धन करणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)