अंगणवाडी परिसरात पाण्याचे डबके
By Admin | Updated: August 10, 2015 01:44 IST2015-08-10T01:44:19+5:302015-08-10T01:44:19+5:30
कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव हा मुलांवर लवकर होत असतो. त्यामुळे शाळा, अंगणवाडी परिसर स्वच्छ असणे गरजेचे असते.

अंगणवाडी परिसरात पाण्याचे डबके
बालकांचे आरोग्य धोक्यात : माहिती देऊनही ग्रामपंचायतीची डोळेझाक
वायगाव (नि.) : कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव हा मुलांवर लवकर होत असतो. त्यामुळे शाळा, अंगणवाडी परिसर स्वच्छ असणे गरजेचे असते. परंतु वायगाव(नि.) येथील वॉर्ड क्र. ८ मधील अंगणवाडी केंद्र क्र. ९३ च्या समोर पूर्र्णत घाण साचली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याचे डबके साचले आहे. यामुळे बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या अंगणवाडीत जवळपास ३० विद्यार्थी आहेत. अंगणवाडी भोवताल सध्या पाण्याचे तळे साचले आहे. तसेच सभोवताल मोठे गवतही वाढले आहे. परिसरातील ग्रामस्थ त्याच कडेला शेणखत टाकत असतात. शेणखत व साचलेले पाणी त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. डासाचा प्रादुर्भावही वाढलेला आहे. अंगणवाडीत येत असलेली बालके ही पाच वर्षांच्या आतील आहेत. सदर बालके या साचलेल्या पाण्याची खेळत असतात. अशावेळी घाण पाण्यातील व गवतातील किडे चावून या बालकांना त्वचेचे आजार बळावण्याची दाट शक्यता आहे. सोबतच सरपटणाऱ्या प्राण्यांचीही भीती आहे. या अंगणवाडी परिसरात साचलेले पाणी, घाण, गवत तसेच शेणाचे ढिगारे स्वच्छ करण्यासंदर्भात येथील अंगणवाडी सेविका शबाना खान व मदतनिस यांनी ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी केल्या. मात्र याकडे संबंधितांनी वारंवार दुर्लक्ष केले. त्यामुळे मुलांच्या आरोग्याला धोका हा वाढला आहे. तसेच ग्राम पंचायतीच्या सौदर्यीकरणाचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्राम पंचायतीने विशेष लक्ष देवून हा परिसर स्वच्छ करावा अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)
परिसरावर अवकळा
अंगणवाडी समोरच पाण्याचे डबके साचले आहे. तसेच गवताचे वनही तयार झाले झाले. लहान मुले या पाण्यात व गवतात खेळत असतात. खेळताना पाण्यातील व गवतातील कीडे चावून लहान मुलांना त्वचेचे आजार, तसेच इन्फेक्शन होण्याचा धोका आहे.
गवतामुळे येथे सरपटणारे प्राणीही वावरतात. याचा मुलांना धोका होऊ शकतो. अंगणवाडी परिसर स्वच्छ आणि सुंदर असणे गरजेचे असतानाही येथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
या परिसरात घाण टाकत असलेल्यांना मज्जाव करून त्याच्यावर कारवाई करावी व साचलेल्या पाणी नालीत प्रवाहित होण्याची व्यवस्था करण्याची गरज व्यक्त होत आहे.