जिल्ह्यात १५६ गावातील पाण्याचे स्रोत दूषित
By Admin | Updated: July 1, 2015 02:35 IST2015-07-01T02:35:37+5:302015-07-01T02:35:37+5:30
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाद्वारे जिल्ह्यात एप्रिल व मे २०१५ या महिन्यात स्वच्छता सर्वेक्षण मोहीम राबविली.

जिल्ह्यात १५६ गावातील पाण्याचे स्रोत दूषित
गौरव देशमुख वर्धा
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाद्वारे जिल्ह्यात एप्रिल व मे २०१५ या महिन्यात स्वच्छता सर्वेक्षण मोहीम राबविली. या सर्वेक्षणात ५१४ ग्राम पंचायती अंतर्गत ९३१ गावात दोन हजार ९२० पाण्याचे स्त्रोत तपासण्यात आले. यातील १५६ गावातील स्त्रोत दूषित असल्याचे आढळून आले. ११६ ग्रामपंचायती मिनीडेंजर झोनमध्ये असल्याचे समोर आल्याने जिल्ह्यात चांगलीच खळबळ माजली आहे.
पाण्याच्या शुद्धतेकरिता ब्लिचिंग पावडरसाठी ग्राम पंचायत मोठा खर्च करते. असे असतानाही जिल्ह्यातील ९३१ गावांपैकी १५६ गावांत दूषित पाण्याचे स्त्रोत आले आहे. यामुळे ५१४ ग्रामपंचायतींपैकी ११६ ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड देण्यात आले आहेत. या गावांना सलग पिवळे कार्ड मिळाल्यास त्यांना डेंजर झोनमध्ये टाकून रेड कार्ड दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सलग दोन वर्षे रेड कार्ड मिळाल्यास अशा ग्राम पंचायतचे अनुदान रोखण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात केवळ नोंद असलेल्या पाण्याचेच स्त्रोत तपासले जातात. वास्तवात प्रत्येक ग्राम पंचायतीने आरोग्य विभागात पाण्याच्या स्त्रोतांची नोंद असेलच असे नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीचे संबंधित ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
गावातील ७० टक्यापेक्षा अधिक नागरिक ज्या विहिरी व हातपंपातील पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करतात त्या पाण्याचे स्रोत तपासले जातात. तपासात तीव्र जोखीम आढळल्यास त्या ग्रामपंचायतीला लाल कार्ड दिले जाते.
गावातील असुरक्षित पाणी पुरवण्याची जोखीम ७० टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास तीव्र जोखीम समजली जाते. ती ३० ते ६९ टक्यापर्यंत असल्यास मध्यम जोखीम समजली जाते. स्त्रोताभोवती अस्वच्छता व दुर्गंधीयुक्त वातावरण असल्यास त्या गावांना पिवळे कार्ड दिले जाते.
हिरवे कार्ड हे सर्व जलस्त्रोत व्यवस्थित आढळून आल्यास दिले जाते. यासाठी गावाला पाणी पुरवठा होत असलेल्या संपूर्ण जलस्त्रोताची पाहणी केली जाते. यानंतर वर्गवारी करून कार्ड देण्याचे ठरविले जाते.
सलग पाच वर्ष हिरवे कार्ड प्राप्त केलेल्या ग्रामपंचायतींना चंदेरी कार्ड दिले जाते. त्या गावात कुठलाही साथीचा आजार पसरलेला नसणे आवश्यक असते. अशा ग्राम पंचायतींना शासनाद्वारे गौरव पुरस्कार व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले जाते.