जलयुक्तशिवार; मुख्यमंत्री असमाधानी
By Admin | Updated: May 3, 2015 01:44 IST2015-05-03T01:44:21+5:302015-05-03T01:44:21+5:30
जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत २१४ गावांमध्ये कामाचे नियोजन असून अत्यल्प कामे सुरू झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धेत असमाधान व्यक्त केले.

जलयुक्तशिवार; मुख्यमंत्री असमाधानी
वर्धा : जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत २१४ गावांमध्ये कामाचे नियोजन असून अत्यल्प कामे सुरू झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धेत असमाधान व्यक्त केले. पावसाळ्यापूर्वी प्रस्तावित केलेली संपूर्ण कामे पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची आहे. यात चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गोपनीय अहवाल तयार करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले. याबाबत दर आठवड्याला यंत्रणांनिहाय आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
जलयुक्त शिवार अभियान हा शासनाचा महत्त्वपूर्ण व प्राधान्य असलेला कार्यक्रम आहे. यामुळे पावसाळ्यापूर्वी जलसंधारणाची प्रस्तावित कामे पूर्ण करा. या कामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्यासोबतच सेवा पुस्तकातही नोंद घेण्यात येईल. यामुळे जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाला अधिक गती द्या, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
शनिवारी विकास भवन येथे जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियान, धडक सिंचन विहिरी तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना कामांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चित्रा रणनवरे, खा. रामदास तडस, आ. रणजित कांबळे, आ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास कांबळे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त अनूप कुमार, मनरेगा आयुक्त एम. संकरनारायणन्, जिल्हाधिकारी संजय भागवत, जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर, मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीना व्यासपीठावर उपस्थित होते.
आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचा लाभ मिळावा, यासाठी अधिकाऱ्यांनी संवेदनशीलपणे राहून प्रत्यक्ष काम पूर्ण होईल, याची दक्षता घेण्याची सूचना करताना मुख्यमंत्री म्हणाले, की धडक सिंचन विहिरी सोबतच विविध योजनांतर्गत शेतकऱ्यांना विजेचे कनेक्शन देण्यासाठी अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करावी, विहिरींसाठी अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला जोडणी मिळेपर्यंत पाठपुरावा करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. शेतातील खचलेल्या विहिरी नेरगांतर्गत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात. जिल्ह्यात ३ हजार ५८८ शेतकऱ्यांचे अर्ज असून २ हजार ६३५ लाभार्थी निकषात बसत असून इतरांबाबत प्राधान्याने विचार करण्याबाबतच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
शिक्षण विभागाने दिले २ लाख ५१ हजार
नेपाळ येथे आलेल्या भुकंपग्रस्तांकरिता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गोळा केलेली आर्थिक मदत आढावा बैठक संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाधीन करण्यात आले. एक विद्यार्थी एक रुपया या अनुषंगाने रक्कम गोळा करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न होता; मात्र चिमुकल्यांनी त्यांच्या खाऊचे पैसे दिल्याने यात मोठी रक्कम गोळा झाली. चिमुकल्यांनी गोळा केलेल्या २ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश देताना जि.प. चे उपाध्यक्ष विलास कांबळे, शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, शिक्षणाधिकारी रविंद्र काटोलकर, उपशिक्षणाधिकारी धनराज तेलंग यांच्यासह टाकळी (दरणे) येथील विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. रक्कम गोळा करण्याचे कार्य सुरूच असून यात आणखी निधी येत्या सोमवारी पालकमंत्र्याच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.