भर पावसाळ्यात पाणीटंचाई; ग्रामस्थ त्रस्त
By Admin | Updated: August 9, 2014 23:52 IST2014-08-09T23:52:47+5:302014-08-09T23:52:47+5:30
उन्हाळ्याच्या दिवसांत तीव्र पाणीटंचाईला कंटाळलेल्या येथील नागरिकांना पावसाळ्यातही कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहे़ ग्रामपंचायत प्रशासन

भर पावसाळ्यात पाणीटंचाई; ग्रामस्थ त्रस्त
रोहणा : उन्हाळ्याच्या दिवसांत तीव्र पाणीटंचाईला कंटाळलेल्या येथील नागरिकांना पावसाळ्यातही कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहे़ ग्रामपंचायत प्रशासन ग्रामस्थांच्या किमान अपेक्षांचीही पूर्ती करू शकत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे़ संबंधितांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़
एकेकाळी जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या रोहणा गावात प्रत्येक लहान-मोठी निवडणूक जिद्दीने लढली जात असे; पण कालांतराने हा परस्पर विरोध कमी होऊन सत्तेतून वृद्धांनी बाजूला व्हावे व युवकांच्या हातात सत्तेची चावी सोपवावी, ही मानसिकता वाढीस लागली़ परिणामी, गावात एकोपा निर्माण होऊन ग्रामपंचायत निवडणूक अविरोध पार पाडण्यात आली़ यात गावातील सुशिक्षित, राजकीय जाण असलेल्या राजकीय पक्षातील युवक, युवतींना ग्रामपंचायत सदस्य म्हणून सर्वानुमते निवडण्यात आले़ सत्तेची चावी तरुणांच्या हातात सोपविताना ग्रामस्थांना गावातील पाणीटंचाई, रस्त्यावरील अतिक्रमण व प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्या सोडविल्या जातील, अशी अपेक्षा होती़ यासाठी त्यांना कार्यक्षम म्हणून लौकिक असणारा ग्रामविकास अधिकारी प्राप्त झाला; पण या तरूण चमूचा तीन चतुर्थांश काळ संपला असताना एकही समस्या सुटली नाही़ उन्हाळ्यातील पाणीटंचाईने पावसाळ्यात त्यापेक्षा भयानक रूप धारण केले आहे़ मागील १० दिवसांपासून गावात नळाला पाणी येणे बंद आहे़ नळ योजनेतील विद्युतचे दोन्ही मोटरपंप जळाल्याचे कारण पूढे केले जात आहे़ वास्तविक, एक मोटर पंप जळाला तर दुसरा अतिरिक्त मोटर पंप उपलब्ध ठेवणे प्रशासनाचे कर्तव्य आहे़ मोटर दुरूस्तीला दहा दिवस लागतात़ ही बाब प्रशासनाच्या अकार्यक्षमतेची परिसीमा आहे़
नदीला पाणी आहे़ नळयोजनेच्या विहरीत जलसाठा आहे़ विद्युत वितरण कंपनीने भारनियमन बंद केले आहे़ असे असताना ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ यामुळे गावात ग्रा़पं़ प्रशासनाविरूद्ध नाराजी दिसून येत आहे़ अनेक ग्रामस्थ युवकांच्या हाती सत्ता देऊन आपली फसगत झाल्याची भावना व्यक्त करतात़ काही तरूण सदस्य तर कधीच मासिक सभेला हजर राहत नसल्याची माहिती आहे़ अशा सदस्यांनी राजीनामा देत दुसऱ्या तरूणाला संधी देणे गरजेचे आहे़ उर्वरित कालावधीत पाणीटंचाई जाणवू नये म्हणून शक्य प्रयत्न करावेत, अशी मागणी ग्रामस्थांद्वारे करण्यात येत आहे़(वार्ताहर)