खरसखांडा गावात पाण्याचा ठणठणाट
By Admin | Updated: April 3, 2017 00:47 IST2017-04-03T00:47:41+5:302017-04-03T00:47:41+5:30
तालुक्यातील खरसखांडा या गावात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. पिण्यासाठी व इतर वापरासाठी

खरसखांडा गावात पाण्याचा ठणठणाट
कारंजा (घाडगे): तालुक्यातील खरसखांडा या गावात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. पिण्यासाठी व इतर वापरासाठी पाणी कुठून आणि कसे आणावे असा प्रश्न नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. गावात असलेल्या सार्वजनिक विहिरीला पाणी नाही. याची माहिती शासनाला देण्यात आली असताना खाजगी विहिरी अधिग्रहणाचा निर्णय झाला नाही. यामुळे नागरिकांना पाण्याकरिता भटकावे लागत आहे.
खरसखांडा हे ६०० लोकसंख्येचे गाव. गावातील हँडपंप कोरडे झाले आहेत. नळयोजनेच्या विहिरी खोल करूनही अर्धा तासही पाणी टिकत नाही. गावाशेजारच्या सर्व विहिरी व बोअरवेल कोरड्या झाल्या आहेत. गावकऱ्यांची विशेषत: महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. ग्रामपंचायत कार्यालयावर दररोज ५०-६० महिलांचा मोर्चा येत आहे. ही पाणी समस्या सोडविणे ग्रामपंचायतीला शक्य नसल्यामुळे सरपंच विकास नासरे व गावकऱ्यांनी पंचायत समिती व तहसील कार्यालयावर धाव घेतली. टँकरमुक्त तालुका झाल्यामुळे पाण्याची व्यवस्था कशी करावी हा यक्ष प्रश्न प्रशासनासमोर आहे.
गतवर्षी एका खासगी शेतकऱ्याकडून पाण्यासाठी विहीर अधिग्रहीत केली होती. पण यावर्षी त्या विहिरीनेही तळ गाठला आहे. यामुळे शासनाने त्वरित लक्ष देत पाण्याची समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिकांची आहे.(तालुका प्रतिनिधी)